शनिवार, ८ नोव्हेंबर, २०२५

"आपणांस" वाढ दिवसाच्या शुभेच्छा" !!!

अरे हि कोण माणसं आहेत? आणि हि काय विकृती आहे ? सकाळ धावायला बाहेर पडलो कि मोठे पोस्टर्स आधी दिसतात, ज्यात  एक गाव गुंड असतो आणि खाली अनेक लोम्बते ते आणिक भयानक दिसतात आणि मजकूर तोच  "आपणांस" वाढ दिवसाच्या शुभेच्छा , प्रेरणा स्थान वगैरे पण असतं कधीतरी ... अरे तो "आपणांस"  पोस्टर च्या बाहेर दिसला तर ओळखू पण नाही यायचा, हल्ली जास वाढलंय , आम्ही वाढत असताना असं काही दिसत न्हवतं आणि हल्ली दिखावा पण वाढलाय म्हणा ...

 हाच गाव गूंड आम्हाला आमच्या गणपतीला दिवाळी आमचं स्वागत आमच्याच गल्लीत करतो . (सगळे काय गाव गूंड नसतील म्हणा, पण कोणाला  आपला आपला फोटो चव्हाट्यावर मांडलेला आवडेल)? लहान पणी आम्ही असं पुस्तकातल्या बायकांना , म्हणजे त्यांच्या फोटो ला मिशी आणि दाढी काढायचो आणि पुरुषाला टिकली, लिपस्टिक आणि लांब केस काढायचो, आता पोस्टर्स जरा उंच असतात... 

सकाळी कसं लहान मुलं शाळेत जाताना दिसावीत पक्षी दिसावेत, दुरून एखादी देवळातली घण्टा कानावर  पडावी प्राजक्ताच्या फुलांचा सडा दिसावा, तो डोळ्याला आणि नाकाला पण सुखद असतो  ... तर हे "आपणांस"  गल्लो गल्ली,  नाक्या नाक्या वर ... आणि मुळात "आपणांस"   असा काही शब्द आहे का हो?

आणि एक गम्मत म्हणजे मध्यम वर्ग हा कायम श्रीमंतांना किव्हा गरिबांना कॉपी करत असतो ... हल्ली त्या whatsapp च्या स्टेटस वर Happy birthday Sister brother mother father son daughter Wife , आता  wife ठीके म्हणा, चार चौघात बायकोचा वाढदिवस लक्षात आहे हे सांगणं ह्यात शहाणपणा असतो आणि काही जणांना तो करावा लागतो . .. पण शेजारी असलेल्या आई बाबा भाऊ मुलगा मुलगी ह्यांना जागतिक पातळी वर Happy Birthday ? हे का कश्या साठी?अजून न सुटलेलं कोडं आहे , हे म्हणजे आतले कपडे बाहेर बाल्कनीत वाळत घालण्या सारखं आहे, कसं दिसतं ते ? सगळेच घालतात (आतले कपडे) पण म्हणून मिरवायचं कशाला? नाही का ? ? 

सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५

वारी

 वारी ---

जून २०२५

माझ्या बकेट लिस्ट मध्ये अनेक वर्ष वारी होती , आमचे भाऊ करायचे वारी, अनेक वर्ष केली त्यांनी , मी लहान होतो तेव्हा, भाऊ काही तरी करतात हे ठाऊक होतं,  माझ्या आत्याने एकदा सांगितलं होतं मला , कि आळंदी ते पंढरपूर चालत जातात म्हणून, आत्याने केली का मला आठवत नाही (केलं असेल १००%), पण नवऱ्याने केली ह्यात ती खुश होती. 

मग थोडं कळायला लागलं, ज्ञानेश्वर माउली हे खूप मोठं काही तरी आहे हे कळायला लागलं , थोडी (फार) ज्ञानेश्वरी वाचली गेली (अजून कळली नाहीये ). पण मग हळू हळू जाणवायला लागलं कि आपण इथे राहून एकदाही वारी बघितली पण  नाहीये. 

कट टू २०२५- अतुलचा फोन आला (अगदी जिवश्श कंटशश तरी चार महिन्याने एकदा बोलतो आम्ही ), चल वारी ला जाऊ , मी म्हंटल चल ... as simple as that . आमचा एक शुक्रवार ठरवला ,  वारीचा "path" पहिला आणि एक अर्धा दिवस जाऊन येऊ म्हटलं. लोणाद  ला जाऊ असं ठरलं आणि तिथून तरडगाव ते फलटण असा रूट करायचं ठरलं .  म्हणजे मुंबई ते लोणाद  ड्राईव्ह मग तिथे रात्री राहून, तरडगाव मध्ये  ६/७ किलोमीटर वारीत चालून  परत मुंबई. 

आम्हाला काहीहि माहित न्हवतं,  गुगल मॅप लावून लोणाद ला पोचलो, नशिबाने एका लॉज मध्ये रूम मिळाली आणि त्या मॅनेजर ला विचारपूस करून त्याच्या साहेबा कडून माहिती काढली . साहेब म्हणाले सडे तीन ला वगैरे निघा आणि गाडी अलीकडे लावा,  सहा ला पालखी निघते ... हे एवढंच. सकाळी बरोबरसाडे  तीन ला गाडी घेऊन निघालो-  तर पोलीस म्हणाले रस्ता बंद आहे साहेब ... आली का पंचाईत , किती किलोमीटर आहे? ७ म्हणाले पोलीस वाले.  म्हंटल ७ मग पुढे अजून ७ आणि परत ७ आणि ७ आणि २०० किलोमीटर ड्राइव्ह ... अश्या चिंतेत असतानाच,  एक मायाळू पोलीस वाला मला म्हणाला,  "इथून पाठी जावा आणि st स्टॅन्ड वरून लेफ्ट मारा गावातून आहे रस्ता पण तरडपूरला जातोय". लगेच गाडी फिरवून आम्ही निघालो. 

गुगल बाई आम्हाला एका अंधाऱ्या रस्त्यावर घेऊन गेली आणि मध्येच थांबून...  you have arrived म्हणाली , पाऊणे चारला खेडे गावात (आता खेडं नाहीच राहीलं  म्हणा ) कोण कशाला बाहेर पडेल? त्यात बारीक पाऊस पडून गेला होता . तिथे खाकी कपड्यात एक माउली जणू आमचीच वाट पाहत उभी होती .. तोच प्रश्न ..तरडपुर? "समोर जा फाटक  लागेल मग गावा गावातून जा " .." माउली, सोडू का कुठे?"  "नाही हो, मी पुण्याला जायलो , येष्टी असती ५ ची, त्या करता थांबलोय " .. थँक यु "... पुढे फाटक लागलं, बंद होतं,  त्या माणसाने आम्हाला  खूप जास्त confusing रस्ता सांगितलं , पण नशिबाने पाठी मागून एक गाडी आली आणि त्या माणसाला तोच रस्ता लगेच कळला , हिथून  जायलोय  काय? चालतंय कि , असं काही तरी बोलून ती गाडी निघाली , तिच्या मागे आम्ही आणि एक दहा मिनटात असंख्य दिंड्या  दिसायला लागल्या , असंख्य माणसं नुसती चालत होती , हातात एक तारा , झाँजा , झेंडे अगदी शांत पणे निघाले होते सगळे , पहाटे साडे चार - पाऊणे पाच वगैरे झाले असतील पाऊस रात्री पडून गेला होता आणि एक एनर्जी होती, vibrations होते ... वाटेत आम्ही दोघांना विचारलं माउली कुठे सोडू का? त्या माउली  आम्हाला पालखी पर्यंत घेऊन गेल्या.  बीड जिल्हा, वर्षातून एकदा हे करतो म्हणाले , दिंडी क्रमांक २८ का काही सा  होता , पाठी सोय होती राहायची म्हणाले , आता नोंद करून चालत जाणार ... 

अगदी पहिलीच वेळ असल्या मुळे काहीहि  कळत न्हवतं . पण एक सांगायचं म्हणजे सगळ्या दिंडी registered असतात हजारो आहेत एका दिंडीत ३०० -४०० लोकं , त्यांना सकाळी किती माणसं आहेत आणि संध्याकाळी किती? ह्याची नोंद द्यावी लागते. 

आम्ही मग जिथून पालखी निघते तिथे थांबलो, तासाभराने निघाली पालखी आम्ही तिच्या पाठी आणि आमच्या पाठी - पुढे जन समुदाय ---- अलोट गर्दी म्हणालो असतो पण हि गर्दी न्हवतीच मुळी ... लाख काय जास्तच लोकं असतील,  शांत पणे एका मागे एक "ग्यानबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम" करत निघाले होते, आरडा ओरडा नाही धक्का बुक्की नाही मोठं music नाही , सगळं लयबद्ध ... भारवल्यागत आम्ही चार एक किलोमीटर गेलो ... आणि मग सूर्य सुद्धा दर्शनाला हळू हळू झिंक चक झिका , झिंक चक झिका , झिंक चक झिका करत वर आला ... मी खरं तर देव भोळा वगैरे नाहीये अगदीच नास्तिक नसलो तरी फार आस्तिक नाहीये, पण तो एक aura होता ना तो खूप सॉलीड होता , माझ्या ५० वर्षाच्या अस्थिथवात फार कमी क्षण त्या क्षणा सारखे असतील....  ते तुम्ही तुमचे अनुभवायचे असतात मी काय वर्णन करणारे ?

पाच सहा किलोमीटर चालून आम्ही परतीला लागलो , वाटेत अप्रतिम अशी पिठलं भाकरी विकणारे एक छोटे कुटुंब भेटले , सकाळी ३ ला उठलेलो भूक लागली होतीच, दोन चार भाकऱ्या दोन चार प्लेट पिठलं खाऊन पण तो माणूस बाचकत आम्हाला ८० झाले म्हणाला ... मी थोडे जास्तच दिले , माऊलीची कृपा आहे म्हंटला ... लोभ नाही काही नाही अरे कोण  आहेत हि सगळी माणसं , त्या दिवशी मलाच का भेटली ? एस्टी स्टॅन्ड वर कुणी भेटले , त्या पालखी जवळ दोन एक पोलीस वाले पण आम्हाला सांगून गेले, इथे थांबा , दर्शन होईल , पुढे गर्दी असेल, हे सांगून गेले. 

परतीचा २०० किलोमीटर चा प्रवास शांततेत गेला ... आम्ही मारे world economics आणि AI आणि कसं जग बदललं वैगरे गप्पा मारतो ... त्याची ना पर्वा ना फिकर करून लोकं अनेक वर्ष २०-२५ दिवस कसली हि अपेक्षा न करता चालतात मदत करतात कुणाला हि माउली म्हणून नमस्कार करतात, हसतात भजन गात जातात ना गोंगाट ना DJ नुसती श्रद्धा ... ह्यातून लौकिक - मौलिक दृष्ट्या  मिळतं तरी काय? ... आम्हाला तरी काय मिळालं? हा अनुभव?  छोटी छोटी बातो कि है यादी बडी सारखं काही तरी. कुणीही न बोलावता कुठले हि बॅनर्स न लागता १००० वर्ष लोटली तरी माणसं येतच जातात .. वाढतच जातील .  वारी हि एक केस स्टडी आहे आपण किमान एक वाक्य तरी वाचून आलो हेच काय ते मनाला समाधान. 

एकदा तरी वारी करा अगदी मना पासून करा .... 

माउली माउली ...!!!


सागर कुलकर्णी 









पुणे ते फलटण हा रस्ता अगदी सुंदर आहे , म्हणजे आम्ही घोडबंदर वाल्या लोकांना तर अश्चर्यचा सुखद धक्का ... त्या कॉन्ट्रॅक्टर ला इथे बोलवायला हवंय ... माउली त्यांना सद्बुद्धी देवो. 

घाडगे बाबा कायम वारीच्या पाठीच का गेले ते हि कळलं , स्वछ्तेचा जरा अभाव आहे , पण ती चूक प्रशासनाची  आहे ... नुसतं हेलिकॉप्टर नि जाऊन पूजा करून काय होणारे? पायी जाऊन बघायला हवंय एकदा... असो . 








बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२५

उन्हाळ्याची सुट्टी

हल्ली दहावीची परीक्षा एक दीड महिना असते म्हणे... बापरे!!! आमची आठ दिवसात संपली होती, त्यात मराठी आणि geography एकाच दिवशी होता पेपर. 

पण आता ह्या बिचाऱ्या मुलांना लगेच IIT च्या क्लास ला बसावं लागेल ना? मग मुलं उंडारणार कुठे आणि कधी? माझ्या लहान पणीच्या सगळ्या रम्य आठवणी , मैदानातल्या , वाळूतल्या, खेळताना , मित्राच्या खांद्या वर हात टाकून गाव फिरतानाच्या आहेत.  सुट्टीत कित्तेक दिवस आम्ही काहीच करायचो नाही , काहीच म्हणजे काहीच नाही , आता सारखं काही तरी activity करायला लावतो आपण , पण काहीच न करण्यातच खूप काही होतं. bonding होतं आमचं. मी कित्येकदा इतका दमायचो कि रात्री जेवतानाच डुलकी लागायची. दोन महिने सुट्टी म्हणजे सुट्टी होती, नुसती धमाल मस्ती. आता परीक्षाच दीड महिना मग क्लास. आता तर रिस्ल्ट च्या आधीच शाळा सुरु होते म्हणे त्या ICSE वाल्यांची , काय तरी अजब आणि मग पुन्हा सुट्टी. किती confusion. 

प्रत्येक generation वेगळी मजा असते आणि वेगळं challenge असतं.  

मज्जा करा रे पोरांनो अभ्यास आणि शिक्षण आयुष्य भर आहेच पण सुट्टीत काहीही न करायचं फक्त हेच वय आहे. 

सोमवार, २० जानेवारी, २०२५

just do it

Just do It


आज मी दोन वर्षांनी पुन्हा एकदा मॅरेथॉन मध्ये थोडा धावलो ... थोडा म्हणजे धावलो start to finish, पण ते दहाच किलोमीटर आणि हि शर्यत नसतेच मुळी आपण आपापलं धावायचं असतं. 

मी खूप वर्ष धावतोय, आधी २१ किलोमीटर आणि आता १०.   लिहायचं विशेष कारण म्हणजे मी आज धावलो ते फार जास्त प्रॅक्टिस न करता , एरवी मी एक दोनदा तरी धावायचो महिन्यात ह्या खेपेस वर्ष भर फक्त चाललो आणि डायरेक्ट मॅरेथॉन ला धावलो. नियमित चालत सुद्धा न्हवतो खरं तर. नाव देताना सवयी प्रमाणे फॉर्म भरला.  जस जसा धावायचा दिवस जवळ येत गेला तस तसा थोडा विचार करायला लागलो self doubt , कि जमेल का धावायला, एकदम पडलो तर? इजा झाली तर असे सगळे निगेटिव्ह विचार .  पण म्हंटल बघूया  तरी जाऊन आपल्याला कुठे पहिलं यायचंय? अगदीच जड गेलं धावायला तर चालत शर्यत संपवूया कारण चालायला काय प्रॉब्लेम?

तयारी करू म्हणुन गेल्या महिन्यात नवीन शूज आणले nike चे , पण ते मला फार जमले नाहीत (जुन्या शूज मध्येच धावलोय )पण तरी शूज चा मोठा फायदा झाला , तो म्हणजे त्या बॅग चा.... पर्वा काही साफ करताना मला ती बॅग दिसली , त्या वर लिहिलं होतं "just do it" ... म्हणजे करून टाक ना किव्हा असच करून टाक... करचं  किव्हा करूनच टाक असं न घेता मी करून तर बघू,  म्हणून धावलो . विशेष म्हणजे नेहमी धावतो त्याच वेळेत धावलो कहीही त्रास न होता. 

आपण कधी कधी ओझं घेतो एखादं  काम करायचं त्या पेक्षा  just do it करायला हवं .   मी खूप वर्ष झाले धावताना nike  वापरतो , कारण मला सूट होतात बाकी काही नाही , पण मला त्या बोध वाक्याचा अर्थ पर्वा उमगला ... 


गुरुवार, ९ जानेवारी, २०२५

बिस्किटाचा चुरा

तुम्ही कधी बिस्किटाचा चुरा विकत घेऊन खाल्लाय का?

एकदा असाच माझ्या लहानपणी, मी आमच्या राजेंद्र स्टोर मध्ये काही बिस्कीट का ब्रेड का टोस्ट काहीतरी आणायला गेलो होतो , तेव्हा माझ्या ओळखीचा एक मुलगा पण आला होता तिथे बन्सी चाळीतला, त्याने १० पैशाचा चुरा मागितला, माझ्या करता ते फार नवल आणि नॉवेल होतं, कारण मी कायम बिस्कीट किव्हा टोस्ट विकत घेतले होते. तो मित्र म्हणाला मस्त रेहताय खाया क्या कभी? तू भी ले? चुरा हा काय प्रकार आहे मला कळलं नाही कारण त्या पोराने पुडीत बांधून घेतलं. माझं प्रश्नार्थक चेहरा बघून तो स्टोर वाला म्हणाला तू सोड ते, त्या पोराला पिटाळलं आणि मला माझा ब्रेड का पुडा काय तो दिला. 

मग माझा इंटरेस्ट आणिक वाढला काय हे चुरा प्रकरण? मग एक दिवस मला ते गुपित समजलं (ती स्टोरी वेगळी), राजेंद्र स्टोर किव्हा केळकर स्टोर किव्हा असल्या दुकानात ना बिस्कीट ,खारी , टोस्ट बरणीत ठेवायचे आणि मग ती बिस्किटं  सम्पली कि खाली चुरा उरायचा , ते फेकून द्यायच्या ऐवजी हि लोक ते १० पैश्याला वगैरे विकायचे. मग तो चुरा चहात टाकून ती खायचे. आमचं नशिब चांगलं होत म्हणून बरणीतली बिस्कीटच होती खालचा चूरा नाही.

आज आठवलं कारण सहज म्हणून मी आज घरातल्या बरणीत बिस्कीट भरत असताना तो उरलेला चुरा खाऊन बघितला (काय हौस बघा) कुरकुरीत नसला तरी खुशखुशीत मात्र नक्कीच होता ... 

काय तरी आठवणी असतात.  एक कण भर चुरा पण मनाला मण भर चारा देऊन गेला ...