शनिवार, १६ ऑक्टोबर, २०२१

मारहाण

 काल माझ्या घरात घुसून १० लोकांनी माला मारायचा प्रयत्न केला , हे वाक्य  ऐकून  वाईट  वाटतं थोडी भीतीही वाटते, पण जेव्हा आपल्याच सोसायटीतली २० ते २५ ह्या वयोगटातली सुशिक्षित आणि "सुसंस्कृत " घरातली मुलं एका पन्नाशीच्या माणसाला शारीरिक इजा व्हावी ह्या उद्देशाने घरात घुसून मारतात तेव्हा समाज म्हणून आपण हादरलो पाहिजे. 

हा प्रसंग नावररात्रीत माझ्या बरोबर घडला, थोडक्यात सांगायचं म्हणजे आमच्या कडे दर वर्षी गोंगाटात अतिशय कर्कश अश्या आवाजात (अगदी १२० डेसिबल पर्यंत) खूप लोकं (काही आतली काही बाहेरची ) चांगले कपडे घालून नाचतात आणि त्याला "नवरात्र" असं धर्माचं लेबल लावतात (किती छान! सोजवळ आणि सोईस्कर न ?), मग तुम्हाला ते आवडो का न आवडो तुमचं वय ९० वर्ष असो का ९० दिवस, तुम्ही  आजारी असो का परीक्षा असो अगदी निमूट पणे ते सहन करावं लागतं कारण मग त्याला धर्माचा रंग चढतो (मग तो हिरवा असो वा भगवा तुम्ही त्याला बोट दाखवू शकत नाही) आणि तुम्हाला सगळा त्रास, नऊ दिवस (नऊहि  दिन है ना ? क्या प्रॉब्लेम है? असं हि लोकं मला म्हणाली आहेत) सहनच "चं"  करावा लागतो , दरवर्षी प्रमाणे यंदाही , (कायद्या मध्ये बसत नसतानाहि ) आमच्या घराखाली गरबा खेळण्यात आला. 

त्या दिवशी मी एका माणसाला फोन वर शिव्या घातल्या , तो खाली निवेदन करत  होता म्हणून त्याला, त्यानेही दिल्या आणि मग २० माणसं घेऊन माझ्या घरी आला आणि मला ओढून खाली घेऊन जाऊ लागला माझ्या हातातला फोन ती पोरं घेऊ लागली मी आरडा ओरडा केला तेव्हा आतल्या खोलीतून माझे ८९ वर्षांचे वडील आले , तेव्हा माझ्या नशिबाने ती लोक शांत झाली आणि खाली गेली. 

मुद्दा हा नाहीये कि लोकं गरबा खेळतात आवाज करतात मी शिव्या दिल्या त्याने दिल्या, मुद्दा हा आहे कि शिवी दिली म्हणून एकाच complex मध्ये २० वर्ष एकत्र राहणारी माणसं एवढी हिंस्त्र होतात? हि सगळी मध्यम वर्गीय सुशिक्षित लोकं, मला ओळखणारी माणसं हेही कबूल करतील कि कुणाच्या अंगावर धावून जाणे शिव्या देणे हे माझ्या मूळ स्वभावात नाही, तरीही एखाद्या माणसाला २० लोकांनी मारावं हा इतका मोठा गुनाह होता?

मदतीला एकही माणूस आला नाही, उलट काही ओळखीची माणसं त्यांना प्रोत्साहन देत होती हे जास्त क्लेशकारी होतं.  आपण नुसता देवाचा "धर्म" पाळताना, माणूस धर्म, शेजार, धर्म वैगेरे साफ विसरलोय का? का मुद्दाम अडगळीत टाकलेत? मग तालिबान ला का नावं ठेवा ? ती लोकं तर अशिक्षित आहे (मला मारायला आलेला माणूस एका IT कम्पनी मध्ये VP आहे, म्हणजे "सुशिक्षित" असणारच) तालिबानकडे बंदुका आहेत, मला मारायला येताना मुलं साधे pvc पाईप घेऊन आले होते हाच फरक , शेट्टी म्हणून एक आमच्या इथे एक माणूस राहतो, त्याचं समर्थन आहे ह्या सगळ्याला,   म्हणाला "वोह पाईप नही लगता", त्याला काय सांगू? जखम फक्त शारीरिक नसते. 

कांदिवली पूर्व जिथे मी राहतो तिथे सगळे मध्यम वर्गीय आहेत, पण मोजून चार लोकांनी मला पाठिंबा दिला,  एकाही कमिटी मधल्या माणसाने माझी विचारपूस सुद्धा केली नाही (त्यातलाएक तर त्यांचं समर्थन करतो , बाप को गाली दिया फिर घुस्सा आयेगा ना ? मग तू काय आयुष्य भर मारामारी करत फिरणार का?) ह्यांना काय म्हणायचं? ह्याच माणसाने शेजारचा १७ वर्षाचा मुलगा गिटार वाजतो म्हणून पोलीस ला बोलावून दम भरला होता, आवाजाचा त्रास होतो म्हणून. त्या वेळी त्या मुलाचा बाबा डेंगू नि हॉस्पिटल मध्ये होता. 

 माणुसकी म्हणून तरी विचारा, उद्या तुम्हाला हि मदत लागू शकतेच ना? बाकीच्यांना वाटतंय कि माझ्या घरी तर नाही नं आलं कुणी आणि सागर तर नेहमी त्या देवाच्या कार्यक्रमाला विरोध करतो,  असच पाहिजे. पण त्यांना हे कळत नाही कि हि प्रवृत्ती फार भयानक आहे ती लोकं आज माझ्या घरी आलीत उद्या त्यांच्या कडेजातील , जर एक सुशिक्षित (आणि सुंस्कृत असं म्हणणार होतो, पण आवरलं) माणूस हे करू शकतो तर बाकीचे काय करतील?

हि वृत्त्ती मुळा पासून नको का काढायला? आणि आत्ताच जर सगळ्यांनी मिळून ह्या प्रवृत्ती ला उखडून नाही फेकलं तर उद्या आपली मुंबई राहील का सुरक्षित? अजून पर्यंत माझ्या घरी नाही ना? मग राहूदे,  हे किती दिवस चालणार? उद्या हीच मुलं खाली दंगा करतील, किव्हा दारू पिऊन मुलींना छेडतील आणि कुणी काही बोललं तर ते घरी येऊन मारतील. 

खूप लोकं करतात म्हणून बरोबर आणि कुणी ह्याला विरोध केला तर त्याला मारा, धडा शिकवा,  हे जे सगळं चाललंय ना ते फार भीती दायक आहे. वाईट माणसं जशी कळपात असतात नं? तशी चांगली माणसं हि एकेकटी असतात पण वेळे प्रसंगी ह्या सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मी म्हणतो तेच बरोबर आणि चांगलं म्हणा, किती भयाव्य आहे सगळं कधी जागे होणार आपण? 

आपण आपल्या मुलांनां काय धडे देतोय? त्या माणसा बरोबर त्याचा १८ वर्षांचा मुलगा आणि त्याचे मित्र होते, मोठे पणी तो मुलगा हेच करेल का?