शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२

तुटकी नाती

एखादं नातं असतं ना? ते लगेच तुटलं कि चांगलं कि हळू हळू संपत गेलेलं बरं? म्हणजे बघा एखादा माणूस हार्ट अटॅक येऊन फटकन जातो, चांगला असतो धड धाकट, एकदम शॉकिंग ... जवळच्यांना त्रास होतो खूप, आठवण तर कायम राहते काही राहिल्याची सल मात्र बोचत राहते आयुष्य भर ... पण ना,  त्रास नाही झाला  जास्त हा एक दिलासा असतो 

कधी कधी माणूस आजारी पडतो आणि मग जातो कधी कधी चिवट आजार होतो कॅन्सर सारखा, मग काही अवयव कापून छाटून,  अजून तग धरतो , कधी बरा होतो पुन्हा,  छान नव्याने अगदी पूर्वी सारखा होतो, कधी कधी ,  बरा होता होता जातो आणि कधी जाता जाता बरा होतो, पण एकूण अवधी, म्हणजे जायच्या किव्हा तारायच्या आधीची  त्रास दायकअसते , म्हणजे काय करायचं हे कळत नाही हो , आणि आपलाच माणूस मरू दे असं नाही म्हणता येत ना?

तसच काही नात्यांचं होत असतं , सुटत नाही, तुटत नाही, जात नाही, चिवट असतं ... कुणाला तरी वाटत असतं जगू दे, कुणी ते संपण्याची आशा करत असतो, कुणी ते असंच मोडकं ठिगळ लावलेलं पुढे ढकलत असतो, कुणी दुसरा ह्या आशेवर असतो कि होईल बरं, एवढे कष्ट काढले ... 

"आशा" नात्यातली किव्हा माणसाच्या आयुष्याची,  त्याला जिवंत ठेवते  ... hope म्हणतात, सगळ्यांना दिसत असलं तरी जगण्याची आणि नातं टिकवण्याची आस जो वर संपत नाही तो वर तसंच असतं .  

सोमवार, २९ ऑगस्ट, २०२२

"एकदा काय झालं"

जयवंत दळवींचं पुरुष नावाचं नाटक होतं , नाना करायचा काम , खूप असं अंगावर येत नाटक ते, म्हणजे तेव्हा यायचं, माझ्या नशिबाने (आणि वया मुळे) मी नाना आणि चंद्रकांत गोखले करायचे, ते version पाहिलं आहे. , पहिला अंक संपताना तो पुढारी म्हणजे नाना त्या मास्तरच्या मुलीवर बलात्कार करतो (म्हणजे नुसतं create केलं ते वातावरण ) आणि ओरडतो त्याच्या नोकरावर  "कोंब तीच गांधी टोपी तिच्या तोंडात "..... एक तर नाना चा आवाज, अंधार, ती मुलगी ओरडते ... असं खूप सुन्न करणारं सगळं असतं आणि पडदा पडतो , एक दोन मिंट सीट वरून कुणीच उठत नाही, म्हणजे तो impact तेवढा होता .  त्या नाटका संदर्भात एक किस्सा माझ्या मित्राने मला सांगितला होता, तो म्हणाला कि असा पडदा पडला आणि मी absolute stunned होऊन एक टक पडद्याकडे बघत होतो आणि शेजारचा माणूस, माला जरा जाऊदे म्हंटला आणि बायको कडे (स्वतःच्या) बघत म्हणाला काय आणू चोको बार का बटर स्कॉच ? 

अरे काय?  सगळा  तो impact घालवून टाकला, तुम्ही icecream खायला येता काय इथे? एक ठेऊन देणार होतो .  (त्या काळी थोडं theatre वगैरे चं वेड  होतं आम्हाला ). नशीब त्या माणसाला लगावली नाही ते (मित्र जरा violent होता). 

कट, टू पर्वा २०२२ ऑगस्ट - मी विवियाना मॉल मध्ये "एकदा काय झालं" पाहायला गेलो होतो (एकटाच) आणिशो VIP स्क्रीन मध्ये होता , छान खुर्च्या शेजारी टेबल  (महाग होतं तिकीट पण तरी बऱ्या पैकी भरलं होतं) ते VIP स्क्रीन म्हणून तुम्हाला अगदी मेनू कार्ड देऊन सीट वर आणून देतात ती लोक, ऑर्डर घेत फिरत असतात  . इंटर्वल ला त्या हिरो ला कॅन्सर आहे हे कळतं तो वर अगदी गोड छान असतं सगळं आणि मग ते लाईट लागले (पडदा काही पडला नाही ), तेव्हढ्यात तिथली बाई (म्हणजे ती serve करते ती ) पुढे आली आणि  म्हणाली would like to order some milk shake ? म्हंटलो मेले, मी शेक झालोय तो हिरो मरणार आता एका तासात आणि तुला मिल्क शेक सुचतोय होय? 

असं मी मनात म्हंटलो आणि गप गुमान बाहेर गेलो... तसं काही फार बदललं नाहीये हो. 


सागर कुलकर्णी 

शनिवार, १५ जानेवारी, २०२२

आज ६४ दिवसांनी कोणत्यातरी आगारात लाल  परी धावली, तुमच्या सारखं मी सुद्धा दुर्लक्ष केलं, (लाल परी म्हणजे ST सांगावं लागतं). 

पण काय झालं न, मी हल्लीच (२५ डिसेंबर च्या आस पास )संजय बरोबर  एक छोटी कोकण ट्रिप केली त्याच्या गाडीतून , मुंबई कोल्हापूर रत्नागिरी, गणपती पुळे, मग गुहागर, दाभोळ , दापोली हे बोटीतून आणि मग मंडणगड गोरेगाव , रोहा ,  पनवेल .... पण हि गोष्ट त्या निसर्गरम्य रोड ट्रिप ची नाही (त्यावर नक्की नन्तर ). 

गुहागर ला जेऊन आम्ही (काय जेवण सांगतो तुम्हाला.. )बोटीमार्गे ( बोटीत गाडी टाकून ) दाभोळ आणि दापोली जाणार होतो, (म्हणजे गेलो तसेच) जाताना रस्त्यात (किती वाईट रस्ता असावा?) उन्हात एक कोळीण टोपली घेऊन जात होती आणि तिने आमहाला हात दाखवला , एक ५ सेकंद विचार करून आम्ही तिला lift दिली, एक अडीच किलो मीटर अंतरावर बोट होती आणि भर उन्हात ती बाई चालत होती म्हणून तिला सोडू म्हणलं. संजय कोकणातलाच (त्याला सगळे रस्ते तोंड पाठ अगदी रायगड जिल्हा ते थेट गोवा , सलाम आहे त्याला) म्हणून त्याने विचारलं "कुठे जाते विकायला मासे?" गुहागर म्हंटली ती, तरी ३ एक किलोमीटर म्हणजे एकूण ५ (वन वे ), मी अंदाज बांधला , सकाळची जाते आणि आता घरी .. जाताना अशीच आणि येताना पन टोपली घेऊन ईक्ले मासे तर लवकर न्हाई तर उशीर .. मी (निरागस पणे) विचारलं वाहन नाही  का मिळत चालत जातेस का ? ती ST बंद आहे ना, करायचं काय आम्ही? तुमच्या सारखी देव माणसं रोज भेटो रे देवा तुम्हाला खूप आविष (आयुष्य ) मिळो ... असं म्हणून उतरली ... साधं सोपं सरळ ... मला म्ह्णून कोकण फार आवडतं .. 

साला आम्ही AC गाडीत , मला शेवटचा ST मध्ये कधी बसल्लो हे आठवत सुद्धा नाही... हि बाई गेले ६४ दिवस रोज १०  एक किलोमीटर माश्याची टोपली घेऊन (भर उन्हात )चालते... आणि आम्हाला मनोभावे खूप आयुष्य मिळो देवा कडे प्रार्थना करते ... किती वाईट आहे हे ... 

एक तर मी अनाडी आहे (आहेसच) किव्हा राजा आंधळा आहे ... आता राजा नाही राहिला हे विसरतो म्हणा ...   

आज अचानक ती बातमी ऐकली, ६४ दिवसांनी कोणत्यातरी आगारात लाल  परी धावली..  आणि सगळं एकदम उफाळून आलं, त्या जोकोविच चं आपल्याला माहितीये पण इथे आपली माणसं वण वण करतायेत ते नाही माहित म्हणून आज सांगावं वाटलं ..