गुरुवार, २५ ऑक्टोबर, २०१८

कीर्तन

बोरिवलीत दातापाड्यामध्ये, लहान पणी आमच्या घरा जवळ रामाचं देऊळ होत, राम नवमी च्या दहा दिवस आधी पासून ते राम नवमी पर्यंत तिथे कीर्तन होयच आणि ते सुद्धा दहा पर्यंत बंद, फार तर साडे दहा, एक बुआ हातात चिपळ्या घेऊन खाखणीत आवाजात भजन म्हणायचे मधेच एखादी छान गोष्ट सांगायचे.  आता अचानक KBC पाहताना एखाद पौराणिक प्रश्नावरच उत्तर पटकन येत, बहुदा आमच्या बाल मनावर काही गोष्टी कोरल्या गेल्या त्या उठून दिसतात मलाच. 

हे आठवायचं कारण म्हणजे काल आमच्या बिल्डिंग खाली माताकी चौकी नावाच्या कार्यक्रमात(?) अतिशय गोंगाट आणि हिंदी पिक्चर च्या गाण्यांच्या चालीवरची भजन एक माणूस दहा स्पीकर आणि कीबोर्ड आणि ढोलक साथीला घेऊन माईक घेऊन बेंबीच्या देठा पासून रेकत होता, आता ह्याला भजन म्हणणं म्हणजे एखाद्या भोजपुरी चित्रपटात काम करणाऱ्या कुणी तरी डॉली नामक बाईला डायरेक्ट माधुरी दीक्षित म्हणून सत्कार करण्या सारख आहे. विशेष म्हणजे काही लोक मान सुद्धा डोलवत होती आणि तिथेच काही लहान मुलं पण बागडत होती. आमच्या बाल मनावर जे शांत सोज्वळ नकळत जे रुजले तसे ह्या लहानगांच्या मनावर काय कोरल जात असेल?