गेल्या आठवड्यात, मेक्सिको मध्ये जिथे मी ट्रेनिंग देत होतो, तिथे तो जो मालक होतो तो आम्हाला शुक्रवारी संध्याकाळी त्या गावातल्या, म्हणजे शहरातल्या डाउन टाउन मध्ये चक्कर मारायला घेऊन गेला. डाउन टाउन म्हणजे नंतर सांगेन, पण जिथे सगळी हॉटेल्स असतात मोठी ऑफिसेस असतात लोकांना फिरायला जागा असते तत्सम जागा.
छान होती जागा थोडं युरोपिअन टच आणि लोक आपल्या सारखी दिसायला. रस्त्यात गाड्या लावून लोक काहीतरी विकत वगैरे होती, थोडी घाण पण होती, यूरोप सारखे चर्च होते (खूप होती, प्रत्येक चौकात चार). आम्ही पाच पन्नास चर्च पहिली (पाच आतून आणि पन्नास बाहेरून). छान आहे शहर आपल्याहून थोडं श्रीमंत पण अमेरिकेच्या तुलनेत कमी. छोट्या गल्ल्या असल्या मुळे गाडी एके ठिकाणी उभी करून, आम्ही पायीच फिरत होतो, तो ऑस्कर (म्हणजे कंपनीचा मालक) आम्हाला थोडी फार माहिती पण देत होता. आम्हाला तो आणि त्या प्रोजेक्टचा डायरेक्टर एका लोकल मेक्सिकन ठिकाणी खायला (आणि टकीला प्यायला )नेणार होते, तो दुसरा माणूस येई पर्यंत थोडं गाव हिंडायला तो आम्हाला घेऊन आला होता.
राउल नावाच्या त्या माणसाचा फोन आला, कि तो आलाय अमुक ठिकाणी म्हणून तो ऑस्कर म्हणाला चला जाऊया, चला म्हंटल. थांब नक्की कुठे आहे ते बघयाला हवय , असं म्हणून तो आम्हाला गल्ली बोळातून फिरवत होता आणि म्हणाला इथेच जवळ माझ्या मोठ्या बहिणीचं दुकान आहे, बघूया का ती आहे का आता? चला म्हंटल, गाईड च्या मागे जस टुरिस्ट जातात तस आम्ही त्याच्या पाठून गेलो. (आता तो मुद्दाम आम्हाला बहिणीच्या दुकानात नेतो आहे हे कळायला आम्हाला वेळ लागला नाही, कारण हॉटेल भलतीकडे आणि हा आम्हाला भलतीकडेच नेत होता आणि अरे हि का ती गल्ली? असा करत होता ). बहीण आर्टिस्ट आहे म्हणाला, ही सगळ्यात मोठी, मधली एक आणि मी, आता ह्याचाच वय ४२-४३, म्हणजे लावा हिशोब, चालताना एकदम एक छोटुकल्या दुकानात तो शिरला, यूरोप मध्ये , त्या town square मध्ये अगदी १० बाय ८ अशी छोटी दुकान असतात ना? त्या ब्रुसेल किव्हा आर्म्सटरडॅम ला आहेत तशी, किव्हा अगदीच गोखले रोड ला आहेत तश्या दुकानात शिरला, आत एक बाई पाठमोरी काहीतरी सामान ठेवत होती, हीच त्याची बहीण, बारीक सारीक होती, वय पन्नास का त्याच्या पुढे एखाद वर्ष असेल, त्याने हाक मारल्या वर मागे वळली आणि त्या ऑस्कर ला बघून इतकी खुश झाली, डोळे मिश्किल होते आणि भावला पाहून एकदम चकाकले, ती लोक अगदी पटापटा मिठ्या मारतात, अरेच्या इथे कसा? बघ किती दिवसाने आलास असं वगैरे म्हंटल असेल कारण ती लोक स्पॅनिश बोलली, मग भावाचे लाड करून झाल्यावर तिने आम्हाला बघितलं आणि हॅलो केलं. मला खूप गम्मत वाटली नवल नाही, वास्तविक आम्ही खरे तर फॉरेनर (म्हणजे त्यांना ), कुणी परक्या देशातील माणूस दिसायच्या आधी तिला भाऊ दिसला, एकाच गावात राहतात, म्हणजे फारा वर्षात भेट नाही असं नाही, पण दुकान नवीनच उघडलंय आणि हा एकदाच का दोनदाच गेला होता त्या आधी, म्हणून भाऊ आल्याचं कौतुक.
ती स्वतः मूर्तिकार आहे, पण सध्या दुकानात लोकल हँडीक्राफ्ट ठेवते, जम बसला कि ठेवीन माझी कला कुसर , सध्या ह्यांचं ठेवते. आम्ही पण दोन चार वस्तू घेतल्या, मग तिचा थोडा गोधळ उडाला, मग त्या ऑस्कर नि चिडवलं कि माझी बहीण रंग ओळखते पण आकडे आले कि confuse होते, लगेच चिडली ना बहीण, अगदीच वर्मावर, बोट ठेवलं त्याने, मी दमलीये म्हणाली आज खूप लोक आली आणि नेमका तिचा पार्टनर कुठे तरी गेला होता , एरवी मी बरोबर करते. मग तिने त्या वस्तू दहा मिंट घालवून छान आर्टीस्टिकली पॅक केल्या. आम्हला थोडा उशीर होत होता कारण तो राऊल येऊन अर्धा तास झाला होता, पण ऑस्कर शांत होता. तिला म्हंटल माझी बहीण पण आर्टिस्ट आहे, किती खुश झाली दोन फोटो काढले आमच्या बरोबर. निघताना परत काहीतरी बोलणं झालं त्यांच्या मध्ये, बहुतेक जास्त पिऊ नकोस ड्राइव्ह करायच आहे, मग तो पण नाही ग अस काहीतरी म्हणाला. आम्हाला म्हणते ह्याला कडेवर घेऊन फिरायचे मी सगळीकडे, मग परत दोघांनी मस्करी केली आणि आम्ही गेलो. पण ती परत त्या लोकल बार मध्ये बाय म्हणाली येऊन गेली, भावाच्याच शेजारी बसली, ती दोघंच गप्पा मारत होते आणि मग दहा मिनिटाने गेली.
मलाही दोन मोठ्या बहिणी आहेत, म्हणून मला फार बर वाटलं, कारण खंड बदलला तरी मोठी बहीण आणि लहान भाऊ ह्या नात्यात खंड नाही पडला . आज सगळे mothers day करत होते, दोन चार स्टॅंडर्ड मेसेज फिरत होते, स्वातीने , एक ओरीजिनल मेसेज पाठवला आणि अचानक मला वाटलं हो खरय, मदर म्हणजे फक्त आईच का? जवळ जवळ सगळ्या नात्यात आई असतेच ना? पण बहीण हि आईच्या अगदी जवळ जाणारी असते आणि हा प्रसंग मला आठवला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा