आदरणीय भिडे मॅडम ,
स.न.वि.वि,
स.न.वि.वि,
पत्र लिहिण्यास कारण कि, सध्या जे जंगल का बाग? हा वाद चाललंय त्या बद्दल. सध्या मुंबईकर खूप त्रस्त आहे , मेट्रो २०१९ होणार म्हणून आम्ही सगळं निमूट पणे, (कैकदा तुमची हिरहिरीने बाजू मांडून) सहन केलं, तर आता तुम्ही म्हणता २०२१ मध्ये होईल, म्हणजे अजून दोन वर्ष त्रास? आणि काय सांगा २०२१ च २०२३ होईल , सरकार बदललं तर २०३१ पर्यंत हि होईल ह्याची खात्री नाही. तुम्ही आरे ची झाड कापून आमच्याच तोंडाला पान पुसताय असं वाटतंय हो आम्हाला. बोरिवली ते अंधेरी हा सगळ्यात जास्त ट्राफिक कोंडी होणारा रास्ता तो सुद्धा पाच वर्षात नाही होऊ शकत? हा रस्ता असाही हायवे वाला , म्हणजे जागा ताब्यात घ्या असं पण नाही, तरी दिरंगाई का? आणि भर म्हणून तुम्ही JVLR खणून ठेवला, पवई सुद्धा आणि LBS पण अडवलात, मिलिंद नगर ला तर भुयारी मार्ग झालाय पावसा मुळे, ८ तास नोकरी आणि ६ तास प्रवास, नोकरी ला पोहोचून लगेच घरी निघा आणि घर येताच नाही. हा संताप तुम्ही लक्षात घ्या. परवाच कुणी सांगितलं कि २०३१ पर्यंत सगळी मुंबई मेट्रोमय, उत्तम आहे, पण सरकारी कारभार पाहता हा आकडा म्हणजे, तुझ्या साठी चंद्र तारे आणून देईन ... हे वाक्य सुद्धा फिकं पडेल असंआहे . आणि प्रेमिका सारखं लोकांना हा आकडा पटतोय, नवल आहे. उदाहरण मेट्रो ७ घ्या, काहीही अडथळा नसताना २ वर्ष पुढे गेली. तुमचे मेट्रोचे १० - १२ मार्ग आहेत (उद्या २४ होतील) , म्हणजे एका मेट्रोला दोन वर्ष उशीर तर १० मेट्रोना किती? लावा हिशेब,म्हणून आम्ही जाणकार घाबरलो आहोत.
आम्हाला मुख्यमंत्र्यांचं कौतुक आहेसच खूप गोष्टी करू घातल्या आहेत त्यांनी, माणूस मुसद्दी आहे (आडनावंच फडणवीस, नाना गुण असणारच त्यांच्यात) हुशार आहे, पण मुंबई कडे थोडं दुर्लक्ष करतात. मला सांगा नागपुरात मेट्रो आमच्या आधी झाली, किती लोक जातात? नागपूरला द्या हो मेट्रो, बारामतीला सुद्धा द्या आमचा विरोध नाही. सांगायचा मुद्दा असा कि चार काम घेऊन सगळीच अर्धवट टाकण्या पेक्षा एकच काम आधी पूर्ण करा, लोकांना विश्वासात घ्या, मग लोक झाड काय? मान पण कापा म्हणतील. तर तो विश्वास नाहीये सध्या, सगळे मेट्रो अधांतरी आहेत, माणूस मेल्यावर कळशीभर पाणी देण्यात काय उपयोग? आधी चमचा चमचा द्या, शुद्धीवर आणा मग हळू भांड्यात द्या. आम्ही मीठ भाकरी खात होतो ती घेऊन तुम्ही आम्हाला मेजवानी चा मोह दाखवला, पण पाणी सुद्धा आमच्या ताटातून घेतलत, भाकरी तर दूरची गोष्ट.... आम्ही नुसतं मेनू कार्ड बघतोय, त्यात रोज एक आयटम तुम्ही टाकताय, पण जेवण काही देत नाहीत, नुसतं किचन दाखवताय (आणि खयाली पुलावाचा वास देताय) तर एक विनंती अशी कि एक तरी मेट्रो चालू करा, लोकांचा थोडा त्रास कमी करा मग बघा विरोध सुद्धा कमी होईल.
आरे बद्दल तुम्ही म्हणताय ते बुद्धीला पटतंय मनाला नाही , ते ठीके म्हणा मुंबईकराला मन मारायची सवय झाली आहे आणि २ करोड लोक २ खड्डे नाही बुजवत तिथे आरे किस झाड कि पत्ती है? हे तुम्हाला हि ठाऊक आहे आणि आम्हाला हि. पण एक अहम मुद्दा असा कि तुम्ही ती एक जागा घेऊ शकत नाही कारण अतिक्रमण आहे आणि केस कोर्टात आहे ... तर उद्या तुमचं मेट्रो कार शेड आलं तर त्या लागत पन्नास टपऱ्या येणार १०० झोपड्या येणार ती लोक आणिक हजार झाड कापणार ... त्याच तुम्ही काही करू शकणार नाहीत, केस कोर्टात जाईल आणि हाच वाद माझी नात आणि सरकारी माणसाचा नातू घालत बसतील... "बाप दाखव नाही तर श्राद्ध कर" अस झालं आहे आमचं. मेट्रो दिसत नाहीये अजून आणि दोन वर्ष दिसणार नाही (म्हणजे ३ धरा ) असं तुम्हीच म्हणताय, खूप अन्त नाही पाहू कुणाचा.
तुम्ही हुशार, कर्तबगार आहात आणि फक्त तिथे नोकरी करता म्हणून ह्या वादात आहात, वयक्तिक तुमचा आदर आहेसच. एकदा जमल तर आमच्या बाजूने (न दिसणाऱ्या) मेट्रो कडे बघा आणि काय तो तोडगा काढा.
आपला,
एक त्रस्त असूनही (अजूनतरी) विनम्र मुंबईकर
सागर कुलकर्णी