हल्ली त्या RTE मुळे सगळ्याच शाळान मध्ये सगळीच मुलं admission घेऊ शकतात म्हणे , म्हणजे फक्त उचभ्रू नाही तर साधी जनता पण. काही तरी सूट सेल म्हणा. सांगण्याच तात्पर्य तुमच्या मुलाच्या वर्गात तुमच्या काम वालीची मुलगी असू शकते , तो "हिंदी मिडीयम" नावाचा पिक्चर येऊन गेला ना ? तस .
तर त्यात काही लोक घाबरली , आमच्या मुलाच्या किव्हा मुलीच्या शेजारी ही अशी लोक? आईला म्हणजे? अशी लोक? त्यात लहान मुलांचा काय दोष? खर तर खूप बर होईल , त्या मुलांना पण खूप चांगल बघायला शिकायला मिळेल, त्यांच्या कडून आपल्या मुलांना कष्ट, पैश्याच महत्व वगैरे कळेल, काही मुलांना माहित असेलच आणि चूक पालकांची पण आहे , मागितलं कि आणून देणं हे मी पण करतो म्हणा, त्या मुलानं कडे बघून हे तरी कळेल.
पण एक होऊ शकत त्या मुलांना complex नको यायला, हल्ली काय लहान मुलं डब्यात सफरचंदा ऐवजी खिश्यात Apple घेऊन फिरतात.
आमच्या लहान पाणी हे एक बर होत, आमच्या शाळेत सगळी मुलं यायची आणि खाली खेळायला गेलो कि बाजूच्या चाळीतली पण असायची, तेव्हा झोपडपट्या न्हाव्त्या (आता काय म्हणा चांगल्या घरात पण ते कल्चर आलंय), नुसत्या चाळी होत्या, काही अगदी वाईट होत्या म्हणा , पण आम्ही सगळ्यांशी खेळायचो. आमच्या घरा जवळ बन्सी चाळ होती, अजून आहे , त्यातली पोर जरा डेडली होती, म्हणजे मारामारी, वाह्यात पणा वगैरे , त्यात हुशार माणस पण होती , पण जास्त करून डेडली. तेही आमचे मित्र होते. झालच तर काजू पाडा भाटिया चाळ, कार्टर रोड नंबर ३ ची मुलं , ही सगळीच. आता कधी तरी ओळखीचं भेटतात, काही बदलली असतात काही तशीच.
तसा एकदा मला अँड्रीव भेटला होता, तो मला शाळे पासून ओळखायचा, म्हणजे मी शाळेत जायचो तेव्हा, तो कधी गेला असेल अस वाटत नाही. मी आणि माझा आत्ते भाऊ मनोज दादा पान आणायला गेलो होतो, नवमी का दसरा असेल, आत्या आली होती , जेवण झाल्यावर आम्ही गेलो पान आणायला. हे ही खूप वर्षान पूर्वी, माझ कॉलेज नुकतच झालं होत, दत्त पाडा फाटक तसच होत , फ्लाय ओव्हर न्हवता झाला तेव्हाची गोष्ट. पानाच्या गादीवर अँड्रीव, मला अगदी प्रेमाने भेटला, त्याला थोडं होत माझ्या बद्दल . एकदा दोनदा खाऊन गेला होता घरी, तो का आला होता तेही आठवत नाही, तस माझ्या आईने कुणाकुणाला जेवायला घातलाय म्हणून सांगू? मी बरेचदा मित्रांना घेऊन यायचो, ती काहीही ना बोलता खायला घालायची, अन्नपूर्णाच होती म्हणा, आता नवल वाटत कारण तरुण मूल नीट खातात , तेव्हा कळायचं नाही किती असेल घरी वगैरे , आता अचानक पणे लोक येणे आणि खायला घालणे ही पद्धत सम्पलीच आहे .
तर अस अनेक जणांन पैकी हा एक होता , त्या मुळे आई बद्दल आदर म्हणा कि माझ्या बद्दल आस्था म्हणा, तो नीट प्रेमाने बोलायचा, कारण त्याला घरी नेऊन खायला कुणी घातल असेल अस वाटत नाही मला. एरवी शेर असणारा हा अगदी भीगी बिल्ली झाला होता घरात, अगदी हळु खाल्लं आणि परत काहीही मागितलं नाही , ताट कुठे धू म्हणाला :), एकदम भारावला होता , भरल घर कधी न पाहिलेला, असं आई खायला देतेय छान टेबल खुर्च्या नळाला पाणी, त्याला खूप भरून आल्या सारखं वाटलं मला तेव्हा, मला कळलं नाही असं काय करतोय हा? कारण मला हे अगदी नॉर्मल होत हे त्याला स्वप्न वाटत होत. तर हा अँड्रीव आम्हाला पानाच्या गादीवर भेटला पांढरे कपडे हातात, गळ्यात सोन, मनोज दादा कडे बघून अपना भाई क्या? अस म्हणाला, (अपना)? मी जमेल तेवढं त्याच्या धंद्याच सोडून इतर गोष्टीन बद्दल चर्चा करत होतो, तेवढ्यात त्यानेच आगाऊ सारखं भाई किधर रेहताय असा विचारलं , ठाणा म्हणाला मनोज दादा , आता मी पुढच्या गोष्टी साठी मनाची तयारी करत होतो कारण मला पुढे काय संभाषण होणार ते माहित होत, अँड्रीव लगेच अरे ठाणा में किधर? आत्या कुठे राहते ते सांगून झाल, मे भी था म्हणाला ठाणा में , तरी मी त्याला म्हंटलं चल निकलते है हं लोग, पण मनोज दादा ला कस कळणार बिचाऱ्याला , विचारल त्याने , किधर था ठाणा में? ठाणा जेल में हाप मर्डर किया ना , साला बच गया , ज्यादा नई दो साल था , अभि जमानत पे भार है, छूट जायेगा, अब ओह सब नई करताय , कभी आयेगा तो मिलेगा आपको . कूच लगेगा तो बोलना सागर को, एकदम खास है अपना, तू बोला नई क्या भाई को अपने बारे मे? त्याच्या पांढऱ्या शर्ट खाली त्या रामपुरी चा दांडा मला स्पष्ट दिसत होता तो काय माझ्या थोरल्या भावाच्या नजरेतून सुटणारे? ...... घरी येई पर्यंत मनोज दादा एक शब्द न्हवता बोलला ...
तर सांगायचा अस कि आपण स्वतः स्वतःला एका कोशात किव्हा पिंजऱ्यात बंद करतो आणि तो आणखी खुजा करत जातोय, पालकांचं म्हणणं कि आम्हाला आमच्या सारखीच मुलं हवीत वर्गात तर मुलांची वाढ खुंटणार ते कोशातच राहणार त्यांचा, हे जग बघा किव्हा आपला भारत देश हा किती विविध लोकांनी भरलाय, इतकी वर्ष सगळे आप आपल्या कोशात होते अजून काही राज्य अशी आहेत जी आपली भाषा सोडत नाहीत, किव्हा IPL बघा, एका टीम मध्ये किती विविध प्रकारची खेळाडू असतात, त्याने किती फरक पडतो बघा, भारताच्या खेळाडूंचा आता रेकॉर्ड बघा IPL नंतर किती सुधारलाय . कारण विविधता , ती हवीच ना. किती नुकसान करणार आपण आपल्याच मुलांचे?