बोरिवलीला, दत्तपाड्यात , आत्ता जिथे फ्लाय ओव्हर आहे तिथे आधी एक मैदान होत, मोठं . आम्ही तिथे फक्त मॅच बघायला किव्हा मॅच खेळायला जायचो, एरवी तिकडे तिथलीच पोर खेळायची राजेंद्र नगर मधली, तिथे त्या हौसिंग बोर्डाच्या बिल्डिंग असतात ना तश्या खूप साऱ्या बिल्डिंग होत्या त्यातली मुलं तिथे खेळायचे आणि मुंबईत एका मैदानात खूप लोक एकदम मॅचेस खेळतात. मी आठवी का नववीत होतो तेव्हाची गोष्ट असेल, एकदा संध्याकाळी त्या मैदानात मी आणि अतुल असेच गेलो होतो आणि तिथली मुलं नॉर्मल क्रिकेट खेळत होती आणि नेहमी प्रमाणे दोन मुलानं मध्ये तू आउट म्हणून थोडी भांडा भांडी झाली, त्यातला एक सरदारजी होता आणि असा पण जाम गरम डोक्याचा होता, त्याला एका मुलाने मारला आणि मग बाकीच्यांनी त्याला सोडवला, तर तो चिडून देख लुंगा मार दूंगा वगैरे म्हणून निघून गेला. पाच मिनिटाने तो मुलगा धावत येत होता आणि हातात चाकू ..मार दूंगा असा मोठयाने ओरडत होता, आवाज कुठून येतो आहे म्हणून आम्ही दचकून बघितल आणि तो दुसरा मुलगा पळत सुटला, त्याच्या मागे तो सरदार, तेवढ्यात त्या सरदारची आई आली धावत , आंम्हाला वाटलं बर झालं आई आली ते , जवळ आल्यावर कळलं कि ती हातवारे करून आपल्या मुलाला सांगत होती, मार साले को मार .... बापरे आमहाला काहीच कळत न्हवत.(त्या काळी विळी होती त्या मुळे भाजी चिरायला पण माझी आई चाकू वापरत नव्हती) नशिबाने तिथल्या मोठया मुलांनी त्या सरदारला धरला आणि हातातला चाकू काढून घेतला, चल जा पळ म्हणून हाकलवला, तरी त्याची आई पीर पीर करतच होती, मेरे बच्चे को झूट आउट किया और मारा ... त्या नंतर आम्ही तिथे परत काही गेलो नाही आणि तो मुलगा पण क्रिकेट खेळताना दिसला नाही, सरदार ला कुणीच खेळायला घेतलं नाही नंतर ..
पुढे कैक वर्षाने तो दुसरा मुलगा वडलांच्या प्रिंटिंग प्रेस मध्ये गर्क झाला आणि बरीच वाढवली त्याला एक छोटा भाऊ पण होता, सरदार पोरगा ... जे होयच तेच झालं, सिगारेट पिताना उभा असायचा केस कापून टाकले , दारू पिताना आणि टवाळक्या करताना दिसायचा ....आई आणि तो दोघंच राहायचे .. आता माहित नाही काय करतात ती दोन मुलं ... झाली त्या गोष्टीला आता ३५/३६ वर्ष . पुढे खूप मारामाऱ्या जवळून पहिल्या अशी चिडकी भडक माथ्याची पोर पण बरीच दिसली .... पण ती सरदारीण "मार साले को मार" कायम लक्षात राहिली ... आईच वळण आपल्या अंग वळणी पडत ना?
सध्या जे काही घडतंय जी मुलं कॉलेजात जाऊन म्हणा किव्हा रस्त्यावर धांगड धिंगा घालतात, खूप विकृत सोशल मीडिया वर पोस्ट करतात किव्हा शेर करतात, मोठ्यांना उर्मट उत्तर देतात, विचार पटले नाही कि अंगावर धावून जातात, मीच बरोबर तू चूक अस म्हणतात ... सारखी हातात तलवार (ही कैक वेळा प्रतीकात्मक असते). हे सगळं बघितलं कि का कुणास ठाऊक मला तो हातात चाकू घेऊन धावणारा मुलगा आणि त्याच्या पाठी येणारी त्याची आई दिसते.... मार साले को मार ....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा