गुरुवार, ७ मे, २०२०

आता मात्र फार झालं ....

आता मात्र फार झालं .... 

दहा बारा वर्षान पूर्वीची गोष्ट असेल, आम्ही कोकणातून  कोल्हापूर मार्गे येत होतो गाडीने, तेव्हा माझी लेक ५  का ६ वरशाची असेल आणि गाडी पण लहान होती,  (अगदी गुणी होती अजिबात कटकट नाही रड नाही हट्ट नाही) आधी दोन चार तास छान गेले, तिनी थोडी झोप काढली मग बाबा कधी येणार घर? हा प्रश्न म्हटलं खूप लागेल आठ दहा तास तरी लागतील, मग तिला मी ते बोर्ड दाखवले मुंबई अमुक एक किलोमीटर चे आणि त्याने अंदाज बांधायला सांगितला , पण का  कुणास ठाऊक ट्राफिक लागत गेलं आम्हाला, पण तिने बिचारीने हू का चू नाही केलं, जीव रमवायला तिने स्वतःला गोष्टी सांगितल्या , गाडीतल्या फडक्याने आतून गाडी साफ करते म्हणाली, ते झालं तरी मुंबई काही येई ना, मग आम्ही ब्रेक घेतला, एक्सप्रेस वे वरून पटकन आलो आणि मुंबईत परत ट्रॅफिक आणि मग कस झाल कि मुंबई आली आणि ते किलोमीटर पण कमी  झाले, पण घर काही येई ना, बाबा ... बाबा ... किती वेळ? मी हि खेकसलो, मग तिचा चेहरा आणिक छोटा झाला, मग मलाच माझा राग आला, मग बाहेरच्या वर ओरडलो, (ती विसरली मी नाही विसरलो) अस मजल दर मजल करत अगदी घरा पाशी आलो, तिलाही आता रस्ता ओळखीचा होता आणि घर अगदी एक किलोमीटर होत म्हणजे आपण आता आलोच हे लक्षात आल होत आणि परत, हे ट्रॅफिक लागलं , एकदम माझी मुलगी मला म्हणाली आता बस बाबा, हे खूप होतंय खूप त्रास दिला ह्या  लोकांनी आता आपण जाऊया चालत .... आता मात्र बस्स ... इतका हसलो ना .. नशिबाने ते ट्रॅफिक लगेच सुटलं म्हणा आणि पाचव्या मिनिटाला आम्ही बिल्डिंग मध्ये, तिच्या चिडून बोलण्या मुळे फरक पडला का कोण जाणे ? सध्या मला हे असं झालं आहे , आम्ही गप गुमान निमूट पणे सगळं सहन केलंय ना? आता बस्स ... 

हा जंतू काही जात नाही इथून अजून थोडे दिवस, महिने वर्ष, आपण आता काळजी घेतोय .हो ना? आता थोडं बाहेर पडूद्या कामाला तरी. ... १७ ला उघडणार म्हणताय, मग परत लोक गर्दी करणार, मग परत तुम्ही बंद करणार .. त्या पेक्षा हळू हळू थोड्या थोड्या लोकांना बाहेर येऊ द्या... आमच्या गरजा पण सरकार ठरवतंय (हे लै होतंय), म्हणून पंखे आणि ac विकण्याचं दुकान बंदच , पण दारू चालू केली..(काय लॉजिक असेल?)  लोकांना थंड वाटावं आणि सरकारी तिजोरी गरम व्हावी म्हणून, एक तर दारू बंदीला माझा विरोध आहे (आणि पंखे विक्री बंद केली त्याला पण) अरे स्टेशनरी पण बंद? का लोक काय गर्दी करून पेन घेणार? आहो गरजेला पेन लागत, मुलं घरी आहेत पुस्तक, वह्या, कागद, टेप, गम, स्टेपलर, रबर, खोड रबर, पिना (मारायला नाही) फोल्डर, फाईल, अनेक गोष्टी लागतात ...आणि हे लागतं हो ..रोज नाही लागल तरी गरजेची वस्तू आहे.  आता  पंखा बंद पडला तर माणूस उकाड्याने मरेल, पण कुणी तरी ठरवत कि जेवण फक्त गरजेचं उन्हाळ्यात पंखा नसला तरी चालेल, आता पंखा विक्री चालू केली तर काय लोक तो गळफास लावायला वापरतील हि भीती आहे का सरकारला? मार्च सरला, एप्रिल एकदाचा रखडत खरडत पार पडला मे आला आता जीव जातोय उकडून त्यात ट्यूब गेली आहे खूप जणांची, तरी अंधार चालेल, जेवायला मिळतंय ना? अरे? काय चाललंय काय? रोटी कपडा मकान हा प्रश्न खूप साऱ्या लोकांनी सोडवलाय, चार दिवस नाही मिळाली भाजी तरी वरण भट उसळ पोळी पिठलं भाकरी (किती भारी मेनू बघा भाजी वीणा ) किव्हा पोहे खाऊन सुद्धा जगतील लोक पण पंखा एक मिंट बंद करून बघा ... तर पंखा फक्त प्रतीकात्मक आहे.  अश्या खूप गोष्टी आहेत .. काही लोक फक्त अती श्रीमंत आणि अती गरीब लोकांचे प्रॉब्लेम्स बघतात .. मध्यम वर्ग ? त्याला गृहीत धरलाय ...  आता बस्स ... 

माझे दोन चार प्रश्न वजा सल्ले आहेत (हे आपले मलाच), एक तर होम डिलिव्हरी फक्त जेवण (काय जेवण जेवण चाललंय कोणास ठाऊक )बाकीचं काही नाही  का? आता तोच माणूस भाजीची डिलिव्हरी करणार आणि तोच कागद आणि  पेन, पण नाही (आम्ही pain सहन करायचा पण पेन नाही मिळणार) .. आता माझी बहीण चित्रकार आहे तिला रंग हवेत, पण नाही ते विविध रंगाची भाजी खा म्हणतात (बळी राजाचा बळी जाईल... ) पण रंग नाही देणार , (नाही म्हणजे नाही ..) आता ती काय फावल्या वेळेत राज्यकारण्यांच्या पोस्टर ला काळं फासणारे (इच्छा असो वा नसो)? आता हॉटेल बंद, बर डिलेव्हरी चालू करा तर ती स्वीगी आणि झोमॅटो ... बार आहेत त्यांना डिलेव्हरी का नाही करुदेत? ती पोर नुसती बसलीयेत त्यांना काम मिळेल empty mind is a devil's workshop . दारू दुकान बंद होती ती उघडली तर झुम्बड .. ती होणारच , (अमेरिकेत पण गर्दी असते) त्या पेक्षा त्यांना पण डिलेव्हरी चालू करू देत , फार तर बाहेर एक डबा ठेवा लोक त्यात आपली ऑर्डर लिहून टाकतील, फोन नंबर लिहितील , तो माणूस देईल घरी आणून, फक्त फोन वर ऑर्डर घ्या, रिक्षा ठेवा डेलिव्हेरी ला, ५० रुपये जास्त घ्या, लोक देतील, रिक्षावाल्यांना पण काम मिळेल, ती लोक भिकारी नाहीयेत, खूप दिवस लोकांच्या दयेवर नाही जगू शकणार, त्यांचा कॉन्फिडन्स नका घालवू काम करू द्या.   गर्दी करायला भाग पाडता आणि परत ढुंगणावर फटके मारता , जी लोक ह्यांना (दारू च्या रांगेत उभे राहणाऱ्यांना )हिणवतात तीच लोक, वाण्या कडे गर्दी करून सामान (एक्सट्रा)स्टॉक करत होती ......

सरकारला प्रॉब्लेम्स आहेतच,  मी असं म्हणत नाहीये कि सगळं मोकळं करा , तुम्ही हवी ती,  हवी तेवढी काळजी घ्याच, पण घरात सगळं उपलब्ध करून द्या... अत्यावश्यक म्हणजे फक्त जेवण नाही.   

१७ ला एकदम उघडलं तर लोक सगळी एकदम बाहेर सांडतील (मग दांडे कमी पडतील पण.. )त्या पेक्षा थोडं थोडं लोकांना बाहेर सोडा कारण १७ लाच फक्त केलत तर परत मोठा प्रॉब्लेम, शाळे मध्ये कस करतात? एक-  एक वर्ग सोडतात, शाळा सुटल्यावर, नाहीतर चेंगरा चेंगरी होईल ना? तस करा शनिवार पासून दुकान उघडा (पंखा , AC , ट्यूब ) रविवारी थोडं हॉटेल ला सूट द्या, सोमवारी एरिया प्रमाणे रिक्षा चालू द्या ओला उबर चालू करा, त्यांना नियमात बांधता येत, घरी जाऊन लोकांना रिपेर ची काम करू द्या , घरातल्या लोकांना सांगा तशी दक्षता घ्यायला , आता सवय झाली आम्हाला काळजी घ्यायची आणि करायची. आता वेड्या सारखं खरंच नाही वागणार .. 

power corrupts and absolute power corrupts absolutely .. आता तर काय झालंय ना कि बिल्डिंगच्या सेक्रेटरी ला पण पावर आली आहे, एरवी शिव्या खाणारा माणूस तो बिचारा आता तो म्हणेल तस , दरवाजा बंद कोई नाही आयेगा कोई नही जायेगा.... असं पावर काही लोकांना दिलंय त्या मुळे काय झालय कि, काही लोक त्या मुळे त्याचा गैर वापर करू लागली आहेत ... (साला पंखा दुकान बंद?). 

आता हा व्हायरस राहणार आहे, त्याच्या बरोबर जगायला शिकायला हवं, नुसतं किती वर्ष घरी बसणार. अजून? लस यायला ८ महिने लागतील किमान, तो पर्यंत काय? एक वाक्य आठवलं  "इतना भी मत डराव कि साला  डर का डर हि खतम हो जाये" लोक शांत आहेत कारण ती अजून तरी गुणी आहेत, लोकांचा फार अंत नका बघू. आम्ही शहाण्या सारखं वागलोय ना आता सरकारनी पण शहाण्या सारखं वागायला हवं ... (हसू नका.. मी सिरिअसली बोलतोय). 

आम्ही आता घर साफ केलं आहे, सगळ्यांशी गप्पा मारल्या आहेत (मी पोळ्या सुद्धा शिकलोय), नवीन छंद ट्राय करून पाहिलाय, वाचन केलंय, झोप काढलीये, मदत सुद्धा केली आहे (गरिबा पर्यंत पोचली असेल अशी अपेक्षा करतोय)आणि घरा पासून ३०० मीटर च्या आत फक्त फिरलोय, ते पण सामान आणायलाच, मित्रां बरोबर पार्ट्या सुद्धा नाही केल्या (बिल्डिंग मधल्या पण) , म्हणून विचारतो .. कधी जाऊ आम्ही बाहेर?

डॉक्टर , बाकी मेडिकल पॅरा मेडिकल , सफाई कामगार, पोलीस , वाणी वाले , भाजी वाले ट्र्क ड्राइव्हर आमचे वॉचमन दूधवाले पेपर वाले ...आणि अशी बरीच लोक ...  ह्यांना मोठा सलाम ... खूप स्तुत्य आहे सगळंच मानलं त्यांना  .. 

पण आम जनतेचं पण कौतुक आहे (लहान मुलांचं तर फारच),  गरीब कामगार , कष्टकरी वर्ग ह्यांना पण सलाम १३० करोड लोक आहेत, त्यातली ०. १ टक्का लोकं पण नियम मोडत नाहीयेत म्हणजे किती कौतुक बघा , आत्ता पर्यंत आम्ही सरकारच ऐकलं , उभे राहा- उभे राहिलो , दिवा लावला - दिवा लावला , घरात बसा..  बसलो टाळ्या  पिटा ... पिटल्या आता आमच जरा ऐका .. कुणी ऐकतय का?

सागर कुलकर्णी 

ता.क   

ते जरा पंखा आणि AC च तेवढं बघा जमतंय का ?
सागर

गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

इरफान

पु ल म्हणतात ना? इतरांच्या डोळ्यात टचकन पाणी आणण आणि रडवणं ह्यात खूप बारीक धागा आहे, ज्यांना जमलं ते महान. ते स्वतः फार जास्त महान होते, म्हणून अनेकदा हसवता हसवता आपल्या डोळ्यात टचकन पाणी आणायचे, अंतू बरवा , हरितात्या ... (आता आम्ही सूरदास ) , हे ऐकताना आपण रडत नाही, पण नकळत डोळे पाणावतात .. अशी अनेक लोक जी पुलंच्या पुस्तकात खेळली आणि त्यांच्या मार्फत आपल्या घरात घुसली आणि मनात बसली ..... काल इरफान गेल्याची बातमी वाचली आणि एक अर्ध्या तासाने, कुणाला तरी सांगताना माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि कंठ दाटला. तस पाहिला गेलो आपण, तर एक साधा नट (नट साधा न्हवता फार मोठा होता) , असे अनेक होऊन गेले, तसाच हा, ह्याच्या जाण्याने मला का रडू यावं, म्हणजे डोळे भरून  यावे? ह्याला कस जमलं बरोबर ? मला माहितहि न्हवत कि हा इतक्या आत गेला आहे ते, माझ्या मनात.  शांत अभिनय अगदी सय्यमाने बोलणारा, माझ्या नकळत इतका मला भावलाय ते काल कळलं, म्हणजे ह्याने मला रडवल नाही, डायरेक्ट काळजात हात घातला आणि निघून गेला, हात घातला होता ते निघून गेल्यावर कळलं, कारण तेव्हाच काळीज हल्ल. माझ्या पेक्षा फार तर  दोन एक वर्ष मोठा असेल, तसा मी दर महिन्याला पिक्चर पाहणारा पण नाही, पण ह्या माणसाचे जे काही पिक्चर पहिले ते डायरेक्ट आत गेले असणार. मला आठवत मी पहिल्यांदा मकबूल पहिला गेलो ते पंकज कपूर साठी आणि वीशाल भारद्वाज साठी, म्हणजे पंकज कपूरने  तर अप्रतिम काम केलंच आहे , पण फार लक्षात राहिला तो हा, म्हणजे व्हिलन सारखं आरडा ओरडा नाही,आदळ आपट नाही, बोलणं पण फार कमीच होत, पण लक्षात राहिला, फार जास्त, मग गुडगाव ला कामा निमित्त असताना मी दर रविवार पिक्चर पाहायचो (दुसरा उद्योग नव्हता रविवारी), तेव्हा एका रविवारी मी "नेमसेक" आणि लगेच "लाईफ इन अ मेट्रो पहिला", मला वाटत तो त्याचा पहिला किव्हा सुरवातीचा कॉमेडी सिनेमा, म्हटलं सलाम आहे माणसाला.  एकदा नेमसेक बघा आणि त्याचा एक विनोदी सिनेमा पहा, म्हणजे मी काय म्हणतो ते कळेल.  मग त्याच्या करता पिक्चर पहिले मी बरेच (त्याच्याच करता जायचो) ... पैसे देऊन ज्याचे चित्रपट पाहावे असे फार कमी आहेत, म्हणजे मी जाईन ते, त्यात ह्याचा नंबर खूप वर लागतो. 

सध्या लोकडाऊन मुळे असेल म्हणा, मी पण खूप बेचैन आहे, म्हणून असेल किव्हा अगदीच आपल्यातला एक असा वाटणारा असेल म्हणा, मी त्याला भेटणं जवळ जवळ अशक्य असलं तरी कधी भेटलाच आणि मी हॅलो म्हटलं तर नक्की त्याच ट्रेडमार्क स्माईल  देऊन हॅलो म्हणेल असं वाटत असेल मला, महणून असेल, पण काल इरफान नि माझ्या डोळ्यात टचकन पाणी उभं केलं, जाताना पण तो मला कुठेतरी भिडला....

सागर 

ता.क.: आताच कळलं कि ऋषी कपूर सुद्धा टाटा करून गेला, पण मी काल ऑलरेडी रडलो आहे

रविवार, ५ एप्रिल, २०२०

कनू

आमच्या जय हरी बिल्डिंग मध्ये १६ ब्लॉक्स होते (आधी सगळे ब्लॉक नंबर म्हणायचे आता फ्लॅट झाले), सगळे वन रूम किचन, आत्ता सारखं सोसायटी - कमिटी असं काही नसायचं, वॉच मन पण न्हवता आणि गेट सुद्धा, कचरा न्यायला मात्र एक माणूस होता ..अशी अनेक येऊन गेली, पण लक्षात राहण्या सारखा कनू ... मी सातवी आठवीत असेन, रविवार सकाळ,  दार वाजलं (आमची बेल कधी चाललीच नाही) मी उघडलं तर एक इस्त्री केलेल्या पांढरा शर्ट आणि पॅन्ट घातलेला माणूस, म्हटलं काय हवं? कचरा .. म्हटलं का? तर तो म्हणाला आज से मे है कचरेवाला ... आयला एकदम हिरो टाईप (कपडे, दिसायला नाही).. एकदम ऐटीत,  नाव काय? अमित ... (डायरेक्ट अमित). 

अमित एकदम भारी होता ऐटीत असायचा कायम टाप टीप, केस पण हिरो टाईप्स  पण विडी तंबाकू कधी ओढताना खाताना पाहिलं नाही, तो खूप वेळ असायचा आमच्या इथे मग आमची मैत्री पण झाली, आई कडून बरेच दा पैसे उसने घेऊन जाईचा आणि तास तास उभा राहायचा गॅलरीच्या बाहेर, (आम्ही तळ मजल्यावर राहायचो) जाईचाच नाही अजिबात, खूप चिकाटी होती त्याची,  मग चिडून आई त्याला ५/१० रुपये द्यायची आता पुढच्या वेळेस नाही मिळणार समजलं? हि वर प्रेमळ धमकी, काय चेहरा खुलायचा त्याचा ५ रूपे बघून,  तो हां असं म्हणायचा आणि परत ये रे माझ्या मागल्या .. मी त्याला म्हटलं कि काय रे अमित असं का करतोस? नवीन पिक्चर आला कि मला बघायचा असतो म्हणून ...म्हणजे तो उसने पिक्चर पहिला न्यायचा.   तो शूटिंग बघायला  मढ ला जाईचा ... आणि मग मला रंगवून सांगायचा मी अमुक हिरोला पहिला हिला पहिला त्याला पहिला .. खर तर मी गावा वरून हिरो व्हायला आलो होतो , पण रोल मिळे पर्यंत टाइम पास आणि थोडे पैसे कमवायला हे करतो , लहान पणी आपल्याला पटत सगळं (मला अजून सगळ्यांचं सगळंच पटत). तू जातो कसा रे? मी त्याला विचारलं कारण आम्ही राहायचो बोरिवली पूर्व आणि तेव्हा रिक्षा वगैरे काही नसायच्या, मला मढ आयलंड ऐकून माहित होत  ... कचऱ्याच्या गाडीवरून..कनू म्हणाला  म्हटलं काय? कचऱ्याच्या गाडीवरून? तो मुन्सिपाल्टी मध्ये "रोजी" (डेली वेजेस) वर काम करायचा , दोन चार रुपये मिळायचे दिवसाला, (sub contract ,ती एक गोष्ट मला नंतर कळली होती  आता नसेल ती पद्धत, तेव्हा होती). हा इधर से फिर मै गाडी पे कचरा लेता है और फिर मढ का गाडी मिला तो शूटिंग ..... अनेक गोष्टी रंगवून सांगायचा मला.  कल किसको देखा होगा  सागर मैने ? बोल? मी -किसको? मिठून एकदम सॉलिड मेरी तरः एकदम व्हाईट मे (मेरी तरः म्हटलं त्याने हे आज मला लिहिताना लक्षात आलं ) मे उसको हात दिखाया (परत मे हात दिखाया ), सही दिखताय ... तेव्हा सगळं नवल  वाटायच. हे सगळं बोलणं गप्पा आमच्या सुट्टीत त्याच काम झालं कि अकरा वगैरे किव्हा कधी दुपारी, गाडी पे नही मिला काम इसलिये आज इधर हि.  मला बरा टाइम पास होता , पण त्याचं बिचाऱ्यच एक दिवसाचा मोबदला जाईचा हे कळण्याचं वय नह्व्त. 

मध्ये दोन चार महिने तो गायब झाला आणि त्या जागी एक बदली बाई देऊन गेला, एकदा तिला आईने विचारलं अरे अमित कभी आयेगा? (खूप महिने तिच्या कडे पण उसनं मागायला कुणी आलं नाही म्हणून तिला  पण चुकल्या चुकल्या सारखं वाटलं असणार) कोण अमित? अरे तुमको काम दिया ना बदलीका वोह ... ओह वोह, वोह कनू है अमित नही... उस्का नाम कनू है अमित कोन बोला आपको? अरे चोरा नाव पण खोटं .. तो कधी येऊन मी  त्याची फजिती करतोय असं झालं होत ... आला तो दोन चार महिन्याने ... मग मी त्याला क्या कनू? कैसा है ? असं म्हटल्यावर कसला उडाला ... सगळेच त्याला कनू .. ए कनू म्हणायला लागले, मुद्द्दाम  .... एकदा असच गप्पा मारताना (काय तरी बघा , कुणाशी गप्पा? पण माझ्या आईच मला आता खूप नवल आणि कौतुक वाटत कि तिने ह्याच्या बरोबर बोलू नकोस ह्याचाशी खेळू नकोस असं कधीच केलं नाही, म्हणजे कुणाहि  बद्दल, नुसतं कनू बद्दलच असं नाही,  माझ्या पुढल्या आयुष्या मी म्हणून कुणाला खालचा वरचा असं नाही समजलो सगळे शेम टू शेम, मी कुणात हि पटकन मिसळू शकतो त्याच बीज लहान पणिच हे असं  पेरल गेल ते आत्ता लक्षात येतंय ....) मला म्हणाला यार मेरेको मेरा नाम पसंद नहिये इसीलिये मे अमित बोला, तू मुझे अमित बोल ना .... मी किती हसलो त्याला म्हंटल अरे नाव काय वाईट नसतं .. तुला काय मला म्हणाला माझं नाव सागर असत तर मी अमित का केलं असत .. कनू हे काय नाव आहे का? मी उद्या पिक्चर मध्ये गेलो तर चालेल का असं नाव .. मला केवढं हसू आलं होत तेव्हा.. मी त्याला म्हटलं ठीके मी अमित अशीच हाक मारेन . आता वाटत कि आपण किती लेबल लावतो आणि नाव ठेवतो अगदी नावाला सुद्धा .. 

एक दिवस एका बाईला आणलं .. आई म्हणाली कोण रे हि ? बायको म्हणाला आणि लाजला तोच (जाम गोड ..) बायको पण स्वछ नीट नेटकी , कनूच काम सुधारलं मढ वगैरे बंद झालं (आमच्या गप्पा पण बंद झाल्या, असं हि मी कॉलेजला गेलो , मला हि वेळ नव्हता ). ती जोडी फार छान होती, त्याला बायको साठी काम हवं होत घर काम, आप रखलो , एकदम साफ है म्हणाला (काही गोष्टींचा अर्थ मला आता फार लागतोय तेव्हा नाही लागला), आई म्हणाली अरे ठेवली असती, माझ असं काही नाहीये (बाकीचे नाही म्हणले होते), पण माझ्या कडे बाई आहे तिला मी नाही काढू शकत, खूप वर्ष आहे ती. तिला आणि कुणी काम दिल नसतंच हे कनूला आणि तिलाहि  माहित होत, मला पण वाईट वाटलं, पण एका गरीबाच्या पोटावर लाथ मारून दुसऱ्या कस काम देणार? पण दोघे फार गप्पा मारायचे,  हसायचे, ती झाडू वगैरे नाही मारायची नुसती यायची अधून मधून.  एकदम प्रेमात असलेलं जोडपं होत . ती दिसायला पण नीटस होती नाहीतर आमचा कनू लग्न करणार? पण छान होते दोघे.  मधेच कनू पैसे मागायचा, मी पण दिलें त्याला एक दोन दा, नवीन सिनेमा आला असणार हे मला कळलं..

एकदा  बायको ला बर नाहीये पोटात दुखतंय, पैसे द्या म्हणाला, हे कारण नवीन होत, पण मग थोड्या दिवसाने म्हणाला,  गाव लेके जाताय, सगळ्यांना वाटलं बाळंतपणाला नेलं असणार, बदली माणूस देऊन गेला, वर्ष झालं तरी येईना .. त्या बदली माणसाला  विचारलं   कि कनू कभी आयेगा .. मालूम नाही म्हणला, उसकी बीवी कैसी है .. मर गई.. काय? हा पेट मे कॅन्सर था इधर से गया और महिने के अंदर मर गयी ... तो इतक्या सहजतेने मर गई म्हणाला .. कि हे  नॉर्मल आहे ह्यात काय एवढं? आमच्या सगळ्यांना खूप धक्का बसला, काय खाण्यात आलं का काय काही कळेना. पण अजून आठवलं तरी वाईट वाटत.  

सहा महिन्याने आला परत , पण एकदम लॉस्ट होता विडी ओढत होता, मी म्हटलं हे काय नवीन? नुसता धूर सोडला त्याने.  यायचा काम करायचा आणि जायचा कपडे मात्र पांढरे कडक इस्त्री वाले, पैसे पण सारखे मागायला लागला उधारी बंद केली आम्ही, एक दिवस एका बाई बरोबर आला आणि हातात एक मुलं दोन चार वर्षाचं , पेहेचानकी है, मी न विचारता सांगितलं, ती यायची रोज त्याच्या बरोबर काम पण थोडं करायची झाड लोट पण लग्न झालेले लोक कशी असतात तशी दोघे यायचे आणि जायचे, फार गप्पा नाही काही नाही.    पिक्चर च वेड कमी झाल होत .. हसरा होता, तसाच चेहरा सडपातळ बांधाच जाड वगैरे झाला नाही कधी , पण त्याच्या चेहऱ्यातल काहीतरी गेल होत.. आमच्या कट्ट्या वर जिथे आम्ही गप्पा मारायचो लहान पणी , तिथे एकदा विडी ओढत बसला होता, मला बघून म्हणाला सब ठीक कॉलेज और सब, ठीके म्हणालो आणि त्याला म्हटलं क्या कनू शूटिंग देखता है के नही?  नही म्हणाला अभी क्या करेगा ? अब चलता वैसा चलने दो, इतका करुण मी कनूला पहिल्यांदाच पहिला, मी एक क्षण त्याला मिठी मारू का असा विचार केला? पण त्याने नजर वळवून धूर सोडायला सुरवात केली होती,  काही न बोलता निघून गेलो तिथून तेच शेवटचं बोलणं असेल आमचं  .. त्याने नोकरी सोडली आमची.  त्या   नंतर पण खूप येऊन गेले खूप मजेदार काही मॅड .. पण कनू सारखा नाहीच आला ...

आज corona मुळे घरीच बसलोय आणि फक्त आमचा झाडू वाला न चुकता रोज प्रमाणे आजहि  आला आणि न चुकता रोज येतो म्हणून त्याला मी १०० रुपये दिले आणि त्याचा चेहरा एकदम खुलला, मला एकदम कनू आठवला....  का कनू आठवला म्हणून त्याला पैसे दिले कोण जाणे? 

मंगळवार, २४ मार्च, २०२०

बिरबल ची खिचडी

बिरबल च्या खिचडी सारखं आहे सध्या, रात्र किती मोठी आहे ते ठाऊक नाहीये, पण बिरबलाच्या गोहष्टीतल्या त्या थंड पाण्यात उभ्या असलेल्या माणसा सारखं आपण व्ह्याच आहे. मीही तेच करतोय आणि माझी खात्री आहे अनेक जण तेच करत असणार. हा curfew कधी संपेल ठाऊक नाही, म्हणून मी एक युक्ती केली ... हे झालं कि मी आधी हे करणारे असं माझं मलाच सांगतोय... म्हणजे काही तरी फँटसी मस्त असं काही जे मला आवडत,घरा बाहेर जाऊन,  मग मी त्यात आणिक रमतो थोडे अधिक रंग भरतो. आता  मी दीदी सारखे रंग भरू शकत नसलो तर देवाच्या दयेने चार चौघांन पेक्षा गोष्टी रंगवण्याची कला माझ्या कडे जास्त आहे आणि फसवायला किव्हा पटवायला आपल्या स्वतः पेक्षा जास्त सोपा माणूस जगात नाही, आपण आपल्यावर फार विश्वास ठेवतो आणि आपल्याला आपलच फार पटत, त्या मुळे मी हि युक्ती काढली आहे. आता , उद्या हे सगळं संपलं म्हणजे मी ती फँटसि करेनच असं नाही, कारण फँटसी मध्ये त्या त्या गोष्टी त्या वेळेला असतीलच असं नाही, पण दिल को बेहेलाने कि लिये गालिब ये खयाल अच्छा है ! असं म्हणत मी आपली रोजची काम करत सुटतो कारण मनात हे संपल कि पाहिलं ते करायचं. तुम्ही तुमची अशी एक फँटसी ठेऊन बघा, मधून मधून हळूच बघा, स्वतः खुश व्हाल काही लोक लाजतील पण आज पेक्षा ह्या नंतर काय छान हे बघण्यात तुम्ही खुश राहाल .. 

मला अजून एक मोठी प्रेरणा मला माझ्या watchman कडून आज मिळाली, त्याच्या वेळेला ड्युटी संपवून तो नित्य नियमाने जे करतो तेच आज करत होता, सगळ्या गाड्या पुसत होता आणि त्याच काम बघण्या सारखं आहे, अगदी मन लावून शांत पणे दोन तास गाडया पुसतो आजही तेच एकही गाडी तीन दिवस बाहेर पडली नाहीये पण तो तेच काम मन लावून करत होता , फक्त मध्ये त्याने तंबाकू मळल्यावर मी त्याला झापला (आवड ), कारण तो त्याच हाताने  तंबाकू मळून तोंडात टाकणार होता, पण मग घाबरून लगेच फेकून दिला, म्हटलं जा हात धू आणि मग खा, नको म्हंटला, इस बहाने आदत छुटेगी ... काही नाही तरी हा फायदा होईल त्याला ..(आणि आम्हाला)  पण सांगायचा मुद्दा म्हणजे, तो दोन तास सगळं विसरून आपलं काम करत होता, मनाला सांगितलंय कि सगळं नॉर्मल आहे, तसा तो शांत आणि संत आहे (४ मुलं आहेत, तंबाकू खातो) :). पण सध्याच्या परिस्थितीत पॉसिटीव्ह राहायला उत्तम उपाय, आपल्या मनाला सांगा  सगळं नॉर्मल आहे  ... 

बुधवार, २२ जानेवारी, २०२०

त्रास

कधी कधी मी खूप बेचैन होतो..   सध्या जे चाललं  आहे त्यांनी म्हणा पण त्रास फार होतो...

धर्म किव्हा संस्था किव्हा एखादा गुरु (धर्मगुरु)  ह्यांच्या कडून शिकून आलेली,  किव्हा खूप पैसे देऊन शांती आणि ज्ञान प्राप्त करून आलेल्या लोकांच्या वागणुकीचा असेल ... पण त्रास फार होतो ...... 

आधी कशाबद्दल व्यक्त होऊ कळत नाहीये, हल्ली व्यक्त होईला हि भीती वाटत्ते आणि मी संघा मध्ये गेलो होतो त्या मुळे, मी काही भेकड धमक्यांना घाबरणारा नाही आणि समाजवादी वगैरे अजिबात नाही (समाजवाद वगैरे काही नसतो स्वार्थ वाद वगैरे असतो) . पण हल्ली सोशल मीडिया वर विकृत लोक जास्त जागरूक आहेत, आधी हि होती, पण आता त्यांना वाचा फुटली आहे कारण ते घोळक्या मागे लपतात..  भेकड आहेत पण मी अजून तरी स्थितप्रज्ञ नाहीये, मी आता कैक लोकांना unfollow केलय, पण तरीही त्रास होतो. 

आधी ह्या निर्बुद्ध कलाकार आणि समाजवादी लोकांना ऐकून मी पुन्हा निराश झालो, म्हणजे फरहान अख्तर तर बरे काढतो पिक्चर, पण आज कळलं कि त्यालाच काही ठाऊक नाहीये .. म्हणून त्रास 

पण खरा त्रास होतोना तो धर्माच्या नावाची अफूची गोळी घेतात त्या लोकांचा, पण कस आहे ना कि देवाचं करतोय, दारू तर पीत नाही ना? मग ठीक.. मग ठीक? मग ठीक? अहो सकाळी दारू उतरते तरी, माणूस एकदा चुकून सोडली तरी म्हणेल, पण ही गोळी रंगच धरते .. सकाळी आणिक चढते , लोक आणि चढवतात.. परवाच कुणी माझ्या ओळखीचं असच एका शिबिराला जाऊन आलं, जिथे श्रीमंत लोक खूप सारे पैसे देऊन मन शांती वगैरे मिळवतात, माझा अजिबात आक्षेप नाहीये, मी हि जाईन एक दिवस नक्की आणि पैसे घेतात त्या बद्दल हि वाद नाही हल्ली कांदा १२० रुपये आहेत (तिथे सात्विक असत, म्हणजे कांदा नाही ) ते तरी काय करणार नुसतं देव देव करून पैसा मिळत नाही हे त्यांना समजत , असो. तर त्यात जाऊन काय छान शिकतात म्हणजे मला खरंच आवडलं ऐकून, खूप छान सोपं आहे, पण हि जी माणसं जातात ना? त्यांचा एक अजेन्डा असतो , तीन दिवस मस्त त्याग वगैरे आणि बाहेर आल कि संपलं ... 

म्हणजे स्वामीजी कसे त्यागी असा म्हणताना  स्वतः ac गाडी शिवाय हलत नाहीत (स्वामी सुद्धा आणि परदेशी फास्ट क्लास नी विमानातून प्रवास) , स्वतःला सगळे मोह, पाश, माया (ही लागतेच), लालच , चैन लागत पण म्हणताना मात्र .... मी अमुक एक स्वामी चा (किव्हा ची) भक्त आहे आमचे स्वामी म्हणजे सगळं त्यागलं (हाविनोद ), मी पण तेच करणारे , फक्त एक फॉरेन ट्रिप आणि आवडीची गाडी, लग्न झालं नसेल तर, एक छान बायको (गुणी, सुंदर, नोकरी असणारी मन मिळाऊ .... ), दोन मुलं  हे झालं कि दोन तास नक्की. हे सगळं ऐकलं कि मला पु ल किती जास्त ग्रेट आहेत ते पुन्हा एकदा जाणवलं ... असा मी असा मी मध्ये असाच तो इंग्ग्रजी बोलणारा आणि पांढरे कपडे घालणारा स्वामी आणि सगळे उच्चभ्रू सेवक ... किती रास्त मांडलंय.तर मला ह्याचा त्रास होतो

त्रास होतो हिंदू नास्तिकांचा, मी हिंदू आहे आणि हिंदू धर्म मानत नाही म्हणून तो वाईट आणि त्या विरुद्ध मी बोलणार, गाय खाणार जा, मला इतर धर्माचं काही माहित नाही म्हणून मी त्यांना का विरोध करू? ते बिचारे चांगलेच असणार ...

मला त्रास होतो तो सैफ अली खान च्या तैमूर ला उदो करण्याचा (नावात काय असत तर मुलाचं नाव टॉमी का नाही ठेवलं ), फरहान अख्तर च्या खोटारडे पण चा नासीर सारख्या उत्तम नटाचा आणि माझ्या अवती भवती उंच कपडे आणि उत्तम गाडी घेऊन फिरणाऱ्या, फॉरेनच्या कंपनीत काम करणाऱ्या आणि तरीही निर्लज्ज पणे कॅपिटॅलिसम च्या विरोधात बोलून JNU चा फुकटे पणा आणि कॉम्युनिझम चे गुणगान गाणाऱ्या लोकांचा ....होतो त्रास होतो ....

असो उद्या नोकरी आहे, ट्राफिक वाढलाय आणि कांदा पण सवाशे आहे, मला त्रास करून चिडून निदर्शन करून चालणार नाही, मी अमेरिकन कंपनीत नोकरी करून ४ प्रत्येक्ष आणि १० अप्रतेक्ष लोकांना संभाळतो ....

तरीही जय हिंद!

शुक्रवार, १० जानेवारी, २०२०

मार साले को मार

बोरिवलीला,  दत्तपाड्यात , आत्ता जिथे फ्लाय ओव्हर आहे तिथे आधी एक मैदान होत,  मोठं . आम्ही तिथे फक्त मॅच बघायला किव्हा मॅच  खेळायला जायचो, एरवी तिकडे तिथलीच पोर खेळायची राजेंद्र नगर मधली, तिथे त्या हौसिंग बोर्डाच्या बिल्डिंग असतात ना तश्या खूप साऱ्या बिल्डिंग होत्या त्यातली मुलं तिथे खेळायचे आणि मुंबईत एका मैदानात खूप लोक एकदम मॅचेस खेळतात. मी आठवी का नववीत होतो तेव्हाची गोष्ट असेल, एकदा संध्याकाळी त्या  मैदानात मी आणि अतुल असेच गेलो होतो आणि तिथली मुलं नॉर्मल क्रिकेट खेळत होती आणि नेहमी प्रमाणे दोन मुलानं मध्ये तू आउट म्हणून थोडी भांडा भांडी झाली, त्यातला एक सरदारजी होता आणि असा पण जाम गरम डोक्याचा होता, त्याला एका मुलाने मारला आणि मग बाकीच्यांनी त्याला सोडवला, तर तो चिडून देख लुंगा मार दूंगा वगैरे म्हणून निघून गेला. पाच मिनिटाने तो मुलगा धावत येत होता आणि हातात चाकू ..मार दूंगा असा मोठयाने ओरडत होता, आवाज  कुठून येतो आहे  म्हणून आम्ही दचकून बघितल आणि तो दुसरा मुलगा पळत सुटला, त्याच्या मागे तो सरदार, तेवढ्यात त्या सरदारची आई आली धावत , आंम्हाला  वाटलं बर झालं  आई आली ते , जवळ आल्यावर कळलं कि ती हातवारे करून आपल्या मुलाला सांगत होती, मार साले को मार .... बापरे आमहाला काहीच कळत न्हवत.(त्या काळी विळी होती त्या मुळे भाजी चिरायला पण माझी  आई चाकू वापरत नव्हती) नशिबाने तिथल्या मोठया मुलांनी त्या सरदारला धरला आणि हातातला चाकू काढून घेतला, चल जा पळ म्हणून हाकलवला, तरी त्याची आई पीर पीर करतच होती, मेरे बच्चे को झूट आउट किया और मारा ... त्या नंतर आम्ही तिथे परत काही गेलो नाही आणि तो मुलगा पण क्रिकेट खेळताना दिसला नाही, सरदार ला कुणीच खेळायला घेतलं नाही नंतर .. 

पुढे कैक वर्षाने तो दुसरा मुलगा वडलांच्या प्रिंटिंग प्रेस मध्ये गर्क झाला आणि बरीच वाढवली त्याला एक छोटा भाऊ पण होता, सरदार पोरगा ... जे होयच तेच झालं, सिगारेट पिताना उभा असायचा केस कापून टाकले , दारू पिताना आणि टवाळक्या करताना दिसायचा ....आई आणि तो दोघंच  राहायचे .. आता माहित नाही काय करतात ती दोन मुलं ... झाली त्या गोष्टीला आता ३५/३६ वर्ष . पुढे खूप मारामाऱ्या जवळून पहिल्या अशी चिडकी भडक माथ्याची पोर पण बरीच दिसली .... पण ती सरदारीण "मार साले को मार" कायम लक्षात राहिली ... आईच वळण आपल्या अंग वळणी पडत ना? 

सध्या जे काही घडतंय जी मुलं कॉलेजात जाऊन म्हणा किव्हा रस्त्यावर धांगड धिंगा घालतात, खूप विकृत सोशल मीडिया वर पोस्ट करतात किव्हा  शेर करतात, मोठ्यांना उर्मट उत्तर देतात, विचार पटले नाही कि अंगावर धावून जातात, मीच बरोबर तू चूक अस म्हणतात ...  सारखी हातात तलवार (ही कैक वेळा प्रतीकात्मक असते). हे सगळं बघितलं कि का कुणास ठाऊक मला तो हातात चाकू घेऊन धावणारा मुलगा आणि त्याच्या पाठी येणारी त्याची आई दिसते.... मार साले को मार ....