सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५

वारी

 वारी ---

जून २०२५

माझ्या बकेट लिस्ट मध्ये अनेक वर्ष वारी होती , आमचे भाऊ करायचे वारी, अनेक वर्ष केली त्यांनी , मी लहान होतो तेव्हा, भाऊ काही तरी करतात हे ठाऊक होतं,  माझ्या आत्याने एकदा सांगितलं होतं मला , कि आळंदी ते पंढरपूर चालत जातात म्हणून, आत्याने केली का मला आठवत नाही (केलं असेल १००%), पण नवऱ्याने केली ह्यात ती खुश होती. 

मग थोडं कळायला लागलं, ज्ञानेश्वर माउली हे खूप मोठं काही तरी आहे हे कळायला लागलं , थोडी (फार) ज्ञानेश्वरी वाचली गेली (अजून कळली नाहीये ). पण मग हळू हळू जाणवायला लागलं कि आपण इथे राहून एकदाही वारी बघितली पण  नाहीये. 

कट टू २०२५- अतुलचा फोन आला (अगदी जिवसच्च कंठसंच्चं तरी चार महिन्याने एकदा बोलतो आम्ही ), चल वारी ला जाऊ , मी म्हंटल चल ... as simple as that . आमचा एक शुक्रवार ठरवला ,  वारीचा "path" पहिला आणि एक अर्धा दिवस जाऊन येऊ म्हटलं. लोणाद  ला जाऊ असं ठरलं आणि तिथून तरडगाव ते फलटण असा रूट करायचं ठरलं .  म्हणजे मुंबई ते लोणाद  ड्राईव्ह मग तिथे रात्री राहून, तारदपूर ते ६ एक किलोमीटर करून परत मुंबई. 

आम्हाला काहीहि माहित न्हवतं,  गुगल मॅप लावून लोणाद ला पोचलो, नशिबाने एका लॉज मध्ये रूम मिळाली आणि त्या मॅनेजर ला विचारपूस करून त्याच्या साहेबा कडून माहिती काढली . साहेब म्हणाले सडे तीन ला वगैरे निघा आणि गाडी अलीकडे लावा,  सहा ला पालखी निघते ... हे एवढंच. सकाळी बरोबर सडे तीन ला गाडी घेऊन निघालो तर पोलीस म्हणाले रस्ता बंद आहे साहेब ... आली का पंचाईत , किती किलोमीटर आहे? ७ म्हणाले पोलीस वाले.  म्हंटल ७ मग पुढे अजून ७ आणि परत ७ आणि ७ आणि २०० किलोमीटर ड्राइव्ह ... अश्या चिंतेत असतानाच,  एक मायाळू पोलीस वाला मला म्हणाला "इथून पाठी जावा आणि st स्टॅन्ड वरून लेफ्ट मारा गावातून आहे रस्ता पण तरदपूरला जातोय". लगेच गाडी फिरवून आम्ही निघालो. 

गुगल बाई आम्हाला एका अंधाऱ्या रस्त्यावर घेऊन गेली आणि मध्येच थांबून...  you have arrived म्हणाली , पाऊणे चारला खेडे गावात (आता खेडं नाहीच राहीलं  म्हणा ) कोण कशाला बाहेर पडेल? त्यात बारीक पाऊस पडून गेला होता . तिथे खाकी कपड्यात एक माउली जणू आमचीच वाट पाहत उभी होती .. तोच प्रश्न ..तरदपुर? "समोर जा म्हणाले फाटक लागेल मग गावा गावातून जा " .." माउली, सोडू का कुठे?"  "नाही हो, मी पुण्याला जायलो , येष्टी असती ५ ची, त्या करता थांबलोय " .. थँक यु "... पुढे फाटक लागलं, बंद होतं त्या माणसाने आम्हाला  खूप जास्त confusing रस्ता सांगितलं , पण नशिबाने पाठी मागून एक गाडी आली आणि त्या माणसाला तोच रस्ता लगेच कळला , हिथून  जायलोय  काय? चालतंय कि , असं काही तरी बोलून ती गाडी निघाली , तिच्या मागे आम्ही आणि एक दहा मिनटात असंख्य दिंडी दिसायला लागल्या , असंख्य माणसं नुसती चालत होती , हातात एक तारा , झाँजा , झेंडे अगदी शांत पणे निघाले होते सगळे , पहाटे साडे चार - पाऊणे पाच वगैरे झाले असतील पाऊस रात्री पडून गेला होता आणि एक एनर्जी होती, vibrations होते ... वाटेत आम्ही दोघांना विचारलं कुठे सोडू का? त्या माउली  आम्हाला पालखी पर्यंत घेऊन गेल्या.  बीड जिल्हा वर्षातून एकदा हे करतो म्हणाले , दिंडी क्रमांक २८ का काही होता , पाठी सोय होती राहायची म्हणाले , आता नोंद करून चालत जाणार ... 

अगदी पहिलीच वेळ असल्या मुळे काही कळत न्हवतं . पण एक सांगायचं म्हणजे सगळ्या दिंडी असतात त्या registered असतात , त्यांना सकाळी किती माणसं आहेत आणि संध्याकाळी किती? ह्याची नोंद द्यावी लागते. आम्ही मग जिथून पालखी निघते तिथे थांबलो, तासाभराने निघाली पालखी आम्ही तिच्या पाठी आणि आमच्या पाठी - पुढे जण समुदाय अलोट गर्दी म्हणालो असतो पण हि गर्दी न्हवतीच मुळी ... लाख काय जास्तच लोकं असतील शांत पणे एका मागे एक ग्यानबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम करत निघाले होते, आरडा ओरडा नाही धक्का बुक्की नाही मोठं music नाही , सगळं लयबद्ध ... भारवल्यागत आम्ही चार एक किलोमीटर गेलो ... आणि मग सूर्य सुद्धा दर्शनाला हळू हळू झिंक चक झिका , झिंक चक झिका , झिंक चक झिका करत वर आला ... मी खरं तर देव भोळा वगैरे नाहीये अगदीच नास्तिक नसलो तरी फार आस्तिक नाहीये, पण तो एक aura होता ना तो खूप सॉलीड होता , माझ्या ५० वर्षाच्या अस्थिथवात फार कमी क्षण त्या क्षणा सारखे असतील....  ते तुम्ही तुमचे अनुभवायचे असतात मी काय वर्णन करणारे ?

पाच सहा किलोमीटर चालून आम्ही परतीला लागलो , वाटेत अप्रतिम अशी पिठलं भाकरी विकणारे एक छोटे कुटुंब भेटले , सकाळी ३ ला उठलेलो भूक लागली होतीच, दोन चार भाकऱ्या दोन चार प्लेट पिठलं खाऊन पण तो माणूस बाचकत आम्हाला ८० झाले म्हणाला ... मी थोडे जास्तच दिले , माऊलीची कृपा आहे म्हंटला ... लोभ नाही काही नाही अरे कोण  आहेत हि सगळी माणसं , त्या दिवशी मलाच का भेटली ? त्या पालखी जवळ दोन एक पोलीस वाले पण आम्हाला सांगून गेले, इथे थांबा , दर्शन होईल , पुढे गर्दी असेल. 

परतीचा २०० किलोमीटर चा प्रवास शांततेत गेला ... आम्ही मारे world economics आणि AI आणि कसं जग बदललं वैगरे गप्पा मारतो ... त्याची ना पर्वा ना फिकर करून लोकं अनेक वर्ष २०-२५ दिवस कसली हि अपेक्षा न करता चालतात मदत करतात कुणाला हि माउली म्हणून नमस्कार करतात हसतात भजन गात जातात ना गोंगाट ना DJ नुसती श्रद्धा ... ह्यातून लौकिक - मौलिक दृष्ट्या  मिळतं तरी काय? ... आम्हाला तरी काय मिळालं? हा अनुभव?  छोटी छोटी बातो कि है यादी बडी सारखं काही तरी. कुणीही न बोलावता कुठले हि बॅनर्स न लागता १००० वर्ष लोटली तरी माणसं येतच जातात .. वाढतच जातील .  वारी हि एक केस स्टडी आहे आपण किमान एक वाक्य तरी वाचून आलो हेच काय ते मनाला समाधान. 

एकदा तरी वारी करा अगदी मना पासून करा .... 

माउली माउली ...!!!


सागर कुलकर्णी 









पुणे ते फलटण हा रस्ता अगदी सुंदर आहे , म्हणजे आम्ही घोडबंदर वाल्या लोकांना तर अश्चर्यचा सुखद धक्का ... त्या कॉन्ट्रॅक्टर ला इथे बोलवायला हवंय ... माउली त्यांना सद्बुद्धी देवो. 

घाडगे बाबा कायम वारीच्या पाठीच का गेले का ते हि कळलं , स्वछ्तेचा जरा अभाव आहे , पण ती चूक प्रशासनाची  आहे ... नुसतं एलिकॉप्टर नि जाऊन पूजा करून काय होणारे? पायी जाऊन बघायला हवंय एकदा... असो .