आज ६४ दिवसांनी कोणत्यातरी आगारात लाल परी धावली, तुमच्या सारखं मी सुद्धा दुर्लक्ष केलं, (लाल परी म्हणजे ST सांगावं लागतं).
पण काय झालं न, मी हल्लीच (२५ डिसेंबर च्या आस पास )संजय बरोबर एक छोटी कोकण ट्रिप केली त्याच्या गाडीतून , मुंबई कोल्हापूर रत्नागिरी, गणपती पुळे, मग गुहागर, दाभोळ , दापोली हे बोटीतून आणि मग मंडणगड गोरेगाव , रोहा , पनवेल .... पण हि गोष्ट त्या निसर्गरम्य रोड ट्रिप ची नाही (त्यावर नक्की नन्तर ).
गुहागर ला जेऊन आम्ही (काय जेवण सांगतो तुम्हाला.. )बोटीमार्गे ( बोटीत गाडी टाकून ) दाभोळ आणि दापोली जाणार होतो, (म्हणजे गेलो तसेच) जाताना रस्त्यात (किती वाईट रस्ता असावा?) उन्हात एक कोळीण टोपली घेऊन जात होती आणि तिने आमहाला हात दाखवला , एक ५ सेकंद विचार करून आम्ही तिला lift दिली, एक अडीच किलो मीटर अंतरावर बोट होती आणि भर उन्हात ती बाई चालत होती म्हणून तिला सोडू म्हणलं. संजय कोकणातलाच (त्याला सगळे रस्ते तोंड पाठ अगदी रायगड जिल्हा ते थेट गोवा , सलाम आहे त्याला) म्हणून त्याने विचारलं "कुठे जाते विकायला मासे?" गुहागर म्हंटली ती, तरी ३ एक किलोमीटर म्हणजे एकूण ५ (वन वे ), मी अंदाज बांधला , सकाळची जाते आणि आता घरी .. जाताना अशीच आणि येताना पन टोपली घेऊन ईक्ले मासे तर लवकर न्हाई तर उशीर .. मी (निरागस पणे) विचारलं वाहन नाही का मिळत चालत जातेस का ? ती ST बंद आहे ना, करायचं काय आम्ही? तुमच्या सारखी देव माणसं रोज भेटो रे देवा तुम्हाला खूप आविष (आयुष्य ) मिळो ... असं म्हणून उतरली ... साधं सोपं सरळ ... मला म्ह्णून कोकण फार आवडतं ..
साला आम्ही AC गाडीत , मला शेवटचा ST मध्ये कधी बसल्लो हे आठवत सुद्धा नाही... हि बाई गेले ६४ दिवस रोज १० एक किलोमीटर माश्याची टोपली घेऊन (भर उन्हात )चालते... आणि आम्हाला मनोभावे खूप आयुष्य मिळो देवा कडे प्रार्थना करते ... किती वाईट आहे हे ...
एक तर मी अनाडी आहे (आहेसच) किव्हा राजा आंधळा आहे ... आता राजा नाही राहिला हे विसरतो म्हणा ...
आज अचानक ती बातमी ऐकली, ६४ दिवसांनी कोणत्यातरी आगारात लाल परी धावली.. आणि सगळं एकदम उफाळून आलं, त्या जोकोविच चं आपल्याला माहितीये पण इथे आपली माणसं वण वण करतायेत ते नाही माहित म्हणून आज सांगावं वाटलं ..