गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

इरफान

पु ल म्हणतात ना? इतरांच्या डोळ्यात टचकन पाणी आणण आणि रडवणं ह्यात खूप बारीक धागा आहे, ज्यांना जमलं ते महान. ते स्वतः फार जास्त महान होते, म्हणून अनेकदा हसवता हसवता आपल्या डोळ्यात टचकन पाणी आणायचे, अंतू बरवा , हरितात्या ... (आता आम्ही सूरदास ) , हे ऐकताना आपण रडत नाही, पण नकळत डोळे पाणावतात .. अशी अनेक लोक जी पुलंच्या पुस्तकात खेळली आणि त्यांच्या मार्फत आपल्या घरात घुसली आणि मनात बसली ..... काल इरफान गेल्याची बातमी वाचली आणि एक अर्ध्या तासाने, कुणाला तरी सांगताना माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि कंठ दाटला. तस पाहिला गेलो आपण, तर एक साधा नट (नट साधा न्हवता फार मोठा होता) , असे अनेक होऊन गेले, तसाच हा, ह्याच्या जाण्याने मला का रडू यावं, म्हणजे डोळे भरून  यावे? ह्याला कस जमलं बरोबर ? मला माहितहि न्हवत कि हा इतक्या आत गेला आहे ते, माझ्या मनात.  शांत अभिनय अगदी सय्यमाने बोलणारा, माझ्या नकळत इतका मला भावलाय ते काल कळलं, म्हणजे ह्याने मला रडवल नाही, डायरेक्ट काळजात हात घातला आणि निघून गेला, हात घातला होता ते निघून गेल्यावर कळलं, कारण तेव्हाच काळीज हल्ल. माझ्या पेक्षा फार तर  दोन एक वर्ष मोठा असेल, तसा मी दर महिन्याला पिक्चर पाहणारा पण नाही, पण ह्या माणसाचे जे काही पिक्चर पहिले ते डायरेक्ट आत गेले असणार. मला आठवत मी पहिल्यांदा मकबूल पहिला गेलो ते पंकज कपूर साठी आणि वीशाल भारद्वाज साठी, म्हणजे पंकज कपूरने  तर अप्रतिम काम केलंच आहे , पण फार लक्षात राहिला तो हा, म्हणजे व्हिलन सारखं आरडा ओरडा नाही,आदळ आपट नाही, बोलणं पण फार कमीच होत, पण लक्षात राहिला, फार जास्त, मग गुडगाव ला कामा निमित्त असताना मी दर रविवार पिक्चर पाहायचो (दुसरा उद्योग नव्हता रविवारी), तेव्हा एका रविवारी मी "नेमसेक" आणि लगेच "लाईफ इन अ मेट्रो पहिला", मला वाटत तो त्याचा पहिला किव्हा सुरवातीचा कॉमेडी सिनेमा, म्हटलं सलाम आहे माणसाला.  एकदा नेमसेक बघा आणि त्याचा एक विनोदी सिनेमा पहा, म्हणजे मी काय म्हणतो ते कळेल.  मग त्याच्या करता पिक्चर पहिले मी बरेच (त्याच्याच करता जायचो) ... पैसे देऊन ज्याचे चित्रपट पाहावे असे फार कमी आहेत, म्हणजे मी जाईन ते, त्यात ह्याचा नंबर खूप वर लागतो. 

सध्या लोकडाऊन मुळे असेल म्हणा, मी पण खूप बेचैन आहे, म्हणून असेल किव्हा अगदीच आपल्यातला एक असा वाटणारा असेल म्हणा, मी त्याला भेटणं जवळ जवळ अशक्य असलं तरी कधी भेटलाच आणि मी हॅलो म्हटलं तर नक्की त्याच ट्रेडमार्क स्माईल  देऊन हॅलो म्हणेल असं वाटत असेल मला, महणून असेल, पण काल इरफान नि माझ्या डोळ्यात टचकन पाणी उभं केलं, जाताना पण तो मला कुठेतरी भिडला....

सागर 

ता.क.: आताच कळलं कि ऋषी कपूर सुद्धा टाटा करून गेला, पण मी काल ऑलरेडी रडलो आहे

रविवार, ५ एप्रिल, २०२०

कनू

आमच्या जय हरी बिल्डिंग मध्ये १६ ब्लॉक्स होते (आधी सगळे ब्लॉक नंबर म्हणायचे आता फ्लॅट झाले), सगळे वन रूम किचन, आत्ता सारखं सोसायटी - कमिटी असं काही नसायचं, वॉच मन पण न्हवता आणि गेट सुद्धा, कचरा न्यायला मात्र एक माणूस होता ..अशी अनेक येऊन गेली, पण लक्षात राहण्या सारखा कनू ... मी सातवी आठवीत असेन, रविवार सकाळ,  दार वाजलं (आमची बेल कधी चाललीच नाही) मी उघडलं तर एक इस्त्री केलेल्या पांढरा शर्ट आणि पॅन्ट घातलेला माणूस, म्हटलं काय हवं? कचरा .. म्हटलं का? तर तो म्हणाला आज से मे है कचरेवाला ... आयला एकदम हिरो टाईप (कपडे, दिसायला नाही).. एकदम ऐटीत,  नाव काय? अमित ... (डायरेक्ट अमित). 

अमित एकदम भारी होता ऐटीत असायचा कायम टाप टीप, केस पण हिरो टाईप्स  पण विडी तंबाकू कधी ओढताना खाताना पाहिलं नाही, तो खूप वेळ असायचा आमच्या इथे मग आमची मैत्री पण झाली, आई कडून बरेच दा पैसे उसने घेऊन जाईचा आणि तास तास उभा राहायचा गॅलरीच्या बाहेर, (आम्ही तळ मजल्यावर राहायचो) जाईचाच नाही अजिबात, खूप चिकाटी होती त्याची,  मग चिडून आई त्याला ५/१० रुपये द्यायची आता पुढच्या वेळेस नाही मिळणार समजलं? हि वर प्रेमळ धमकी, काय चेहरा खुलायचा त्याचा ५ रूपे बघून,  तो हां असं म्हणायचा आणि परत ये रे माझ्या मागल्या .. मी त्याला म्हटलं कि काय रे अमित असं का करतोस? नवीन पिक्चर आला कि मला बघायचा असतो म्हणून ...म्हणजे तो उसने पिक्चर पहिला न्यायचा.   तो शूटिंग बघायला  मढ ला जाईचा ... आणि मग मला रंगवून सांगायचा मी अमुक हिरोला पहिला हिला पहिला त्याला पहिला .. खर तर मी गावा वरून हिरो व्हायला आलो होतो , पण रोल मिळे पर्यंत टाइम पास आणि थोडे पैसे कमवायला हे करतो , लहान पणी आपल्याला पटत सगळं (मला अजून सगळ्यांचं सगळंच पटत). तू जातो कसा रे? मी त्याला विचारलं कारण आम्ही राहायचो बोरिवली पूर्व आणि तेव्हा रिक्षा वगैरे काही नसायच्या, मला मढ आयलंड ऐकून माहित होत  ... कचऱ्याच्या गाडीवरून..कनू म्हणाला  म्हटलं काय? कचऱ्याच्या गाडीवरून? तो मुन्सिपाल्टी मध्ये "रोजी" (डेली वेजेस) वर काम करायचा , दोन चार रुपये मिळायचे दिवसाला, (sub contract ,ती एक गोष्ट मला नंतर कळली होती  आता नसेल ती पद्धत, तेव्हा होती). हा इधर से फिर मै गाडी पे कचरा लेता है और फिर मढ का गाडी मिला तो शूटिंग ..... अनेक गोष्टी रंगवून सांगायचा मला.  कल किसको देखा होगा  सागर मैने ? बोल? मी -किसको? मिठून एकदम सॉलिड मेरी तरः एकदम व्हाईट मे (मेरी तरः म्हटलं त्याने हे आज मला लिहिताना लक्षात आलं ) मे उसको हात दिखाया (परत मे हात दिखाया ), सही दिखताय ... तेव्हा सगळं नवल  वाटायच. हे सगळं बोलणं गप्पा आमच्या सुट्टीत त्याच काम झालं कि अकरा वगैरे किव्हा कधी दुपारी, गाडी पे नही मिला काम इसलिये आज इधर हि.  मला बरा टाइम पास होता , पण त्याचं बिचाऱ्यच एक दिवसाचा मोबदला जाईचा हे कळण्याचं वय नह्व्त. 

मध्ये दोन चार महिने तो गायब झाला आणि त्या जागी एक बदली बाई देऊन गेला, एकदा तिला आईने विचारलं अरे अमित कभी आयेगा? (खूप महिने तिच्या कडे पण उसनं मागायला कुणी आलं नाही म्हणून तिला  पण चुकल्या चुकल्या सारखं वाटलं असणार) कोण अमित? अरे तुमको काम दिया ना बदलीका वोह ... ओह वोह, वोह कनू है अमित नही... उस्का नाम कनू है अमित कोन बोला आपको? अरे चोरा नाव पण खोटं .. तो कधी येऊन मी  त्याची फजिती करतोय असं झालं होत ... आला तो दोन चार महिन्याने ... मग मी त्याला क्या कनू? कैसा है ? असं म्हटल्यावर कसला उडाला ... सगळेच त्याला कनू .. ए कनू म्हणायला लागले, मुद्द्दाम  .... एकदा असच गप्पा मारताना (काय तरी बघा , कुणाशी गप्पा? पण माझ्या आईच मला आता खूप नवल आणि कौतुक वाटत कि तिने ह्याच्या बरोबर बोलू नकोस ह्याचाशी खेळू नकोस असं कधीच केलं नाही, म्हणजे कुणाहि  बद्दल, नुसतं कनू बद्दलच असं नाही,  माझ्या पुढल्या आयुष्या मी म्हणून कुणाला खालचा वरचा असं नाही समजलो सगळे शेम टू शेम, मी कुणात हि पटकन मिसळू शकतो त्याच बीज लहान पणिच हे असं  पेरल गेल ते आत्ता लक्षात येतंय ....) मला म्हणाला यार मेरेको मेरा नाम पसंद नहिये इसीलिये मे अमित बोला, तू मुझे अमित बोल ना .... मी किती हसलो त्याला म्हंटल अरे नाव काय वाईट नसतं .. तुला काय मला म्हणाला माझं नाव सागर असत तर मी अमित का केलं असत .. कनू हे काय नाव आहे का? मी उद्या पिक्चर मध्ये गेलो तर चालेल का असं नाव .. मला केवढं हसू आलं होत तेव्हा.. मी त्याला म्हटलं ठीके मी अमित अशीच हाक मारेन . आता वाटत कि आपण किती लेबल लावतो आणि नाव ठेवतो अगदी नावाला सुद्धा .. 

एक दिवस एका बाईला आणलं .. आई म्हणाली कोण रे हि ? बायको म्हणाला आणि लाजला तोच (जाम गोड ..) बायको पण स्वछ नीट नेटकी , कनूच काम सुधारलं मढ वगैरे बंद झालं (आमच्या गप्पा पण बंद झाल्या, असं हि मी कॉलेजला गेलो , मला हि वेळ नव्हता ). ती जोडी फार छान होती, त्याला बायको साठी काम हवं होत घर काम, आप रखलो , एकदम साफ है म्हणाला (काही गोष्टींचा अर्थ मला आता फार लागतोय तेव्हा नाही लागला), आई म्हणाली अरे ठेवली असती, माझ असं काही नाहीये (बाकीचे नाही म्हणले होते), पण माझ्या कडे बाई आहे तिला मी नाही काढू शकत, खूप वर्ष आहे ती. तिला आणि कुणी काम दिल नसतंच हे कनूला आणि तिलाहि  माहित होत, मला पण वाईट वाटलं, पण एका गरीबाच्या पोटावर लाथ मारून दुसऱ्या कस काम देणार? पण दोघे फार गप्पा मारायचे,  हसायचे, ती झाडू वगैरे नाही मारायची नुसती यायची अधून मधून.  एकदम प्रेमात असलेलं जोडपं होत . ती दिसायला पण नीटस होती नाहीतर आमचा कनू लग्न करणार? पण छान होते दोघे.  मधेच कनू पैसे मागायचा, मी पण दिलें त्याला एक दोन दा, नवीन सिनेमा आला असणार हे मला कळलं..

एकदा  बायको ला बर नाहीये पोटात दुखतंय, पैसे द्या म्हणाला, हे कारण नवीन होत, पण मग थोड्या दिवसाने म्हणाला,  गाव लेके जाताय, सगळ्यांना वाटलं बाळंतपणाला नेलं असणार, बदली माणूस देऊन गेला, वर्ष झालं तरी येईना .. त्या बदली माणसाला  विचारलं   कि कनू कभी आयेगा .. मालूम नाही म्हणला, उसकी बीवी कैसी है .. मर गई.. काय? हा पेट मे कॅन्सर था इधर से गया और महिने के अंदर मर गयी ... तो इतक्या सहजतेने मर गई म्हणाला .. कि हे  नॉर्मल आहे ह्यात काय एवढं? आमच्या सगळ्यांना खूप धक्का बसला, काय खाण्यात आलं का काय काही कळेना. पण अजून आठवलं तरी वाईट वाटत.  

सहा महिन्याने आला परत , पण एकदम लॉस्ट होता विडी ओढत होता, मी म्हटलं हे काय नवीन? नुसता धूर सोडला त्याने.  यायचा काम करायचा आणि जायचा कपडे मात्र पांढरे कडक इस्त्री वाले, पैसे पण सारखे मागायला लागला उधारी बंद केली आम्ही, एक दिवस एका बाई बरोबर आला आणि हातात एक मुलं दोन चार वर्षाचं , पेहेचानकी है, मी न विचारता सांगितलं, ती यायची रोज त्याच्या बरोबर काम पण थोडं करायची झाड लोट पण लग्न झालेले लोक कशी असतात तशी दोघे यायचे आणि जायचे, फार गप्पा नाही काही नाही.    पिक्चर च वेड कमी झाल होत .. हसरा होता, तसाच चेहरा सडपातळ बांधाच जाड वगैरे झाला नाही कधी , पण त्याच्या चेहऱ्यातल काहीतरी गेल होत.. आमच्या कट्ट्या वर जिथे आम्ही गप्पा मारायचो लहान पणी , तिथे एकदा विडी ओढत बसला होता, मला बघून म्हणाला सब ठीक कॉलेज और सब, ठीके म्हणालो आणि त्याला म्हटलं क्या कनू शूटिंग देखता है के नही?  नही म्हणाला अभी क्या करेगा ? अब चलता वैसा चलने दो, इतका करुण मी कनूला पहिल्यांदाच पहिला, मी एक क्षण त्याला मिठी मारू का असा विचार केला? पण त्याने नजर वळवून धूर सोडायला सुरवात केली होती,  काही न बोलता निघून गेलो तिथून तेच शेवटचं बोलणं असेल आमचं  .. त्याने नोकरी सोडली आमची.  त्या   नंतर पण खूप येऊन गेले खूप मजेदार काही मॅड .. पण कनू सारखा नाहीच आला ...

आज corona मुळे घरीच बसलोय आणि फक्त आमचा झाडू वाला न चुकता रोज प्रमाणे आजहि  आला आणि न चुकता रोज येतो म्हणून त्याला मी १०० रुपये दिले आणि त्याचा चेहरा एकदम खुलला, मला एकदम कनू आठवला....  का कनू आठवला म्हणून त्याला पैसे दिले कोण जाणे?